पंजाब काँग्रेसमधील संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. पक्षश्रेष्ठीने पंजाब सरकार आणि राजकारणात जबरदस्ती ढवळाढवळ करू नये. पंजाबमधील परिस्थिती त्यासाठी अनुकूल नाही. यामुळे पक्षाला आणि सरकारलाही मोठी किंमत चुकवावी लागेल. हे पक्षाने समजून घ्यावं, असं अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

एकीकडे विधानसभा निवडणुका जवळ येत असताना दुसरीकडे पंजाब काँग्रेसमधील संघर्ष थांबण्याची चिन्हं नाहीत. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांचे गट आमनेसामने ठाकले आहेत. हा वाद सोडवण्यासाठी काँग्रेसकडून चर्चा आणि भेटीगाठी सुरूच असून, आता नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं वृत्त आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार असून पंजाब काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वात बदल होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राज्याच्या राजकारणात जबरदस्तीने केला जात असलेला हस्तक्षेप थांबवण्याची विनंती केली आहे. पक्षाने पंजाबमधील परिस्थिती समजून घ्यावी, अन्यथा सरकार व पक्षाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा- नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी?

पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर राज्यात मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असून सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी भेट घेतली. सिद्धू यांची प्रदेशाध्यपदी वर्णी लागणार असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी नाराजीचा सूर लावला आहे.

हेही वाचा- पंजाब काँग्रेसमधील वाद चिघळला? सोनिया गांधी भेटीनंतर सिद्धू प्रसारमाध्यमांशी न बोलताच रवाना

पक्षाने पंजाबमधील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला हवी. राज्यातील परिस्थिती पक्ष नेतृत्वात बदल करण्यास अनुकूल नाही. असं पाऊल उचलण्यात आलं, तर त्यांची किंमत पक्ष आणि सरकार या दोघांनाही मोजावी लागू शकते. राज्यातील जुन्याजाणत्या नेत्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.