– मिलिंद मानकर

बाबासाहेबांनी आपल्या समाज बांधवांसाठी मोठी शिक्षण संस्था निर्माण करण्याचा उदात्त हेतूने पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात स्वखर्चाने 87 एकर जागा खरेदी केली होती. 1947 साली बंगला उभारला. बाबासाहेब अठ्ठेचाळीस वेळा आले… दोन-तीनदाच मुक्कामी राहिले… विदर्भपुत्र किसन थूल यांनी अलीकडेच प्रकाशात आणलेल्या बाबासाहेबांच्या या बंगल्याची महती प्रेरणादायी अशीच आहे..

In front of BJP candidate Navneet Rana Congress workers shouted slogans like Vare Panja Aya Panja
जेव्‍हा नवनीत राणांसमोर ‘वारे पंजा…’च्या घोषणा दिल्या जातात…
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”
mohan bhagwat dr babasaheb ambedkar marathi news
“डॉ. आंबेडकरांच्या आचरणात शोषणमुक्त समाजाचा पाया”, डॉ. मोहन भागवत यांचे मत

पुण्याच्या तळेगाव मावळ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रदीर्घ काळ वास्तव्य राहिलं आहे. इथले निसर्गसौंदर्य, माणसांबद्दल बाबासाहेबांना विलक्षण कुतूहल, प्रेम आणि आकर्षण वाटत होतं. बाबासाहेबांसमवेत राहिलेली, त्यांच्या क्रांतिलढय़ात उतरलेली, प्रत्यक्षात संवाद साधलेली, सुखदुःखात एकजीव झालेली अनेक माणसं मावळ परिसरात होती. दत्तोबा लिंबाजी गायकवाड, रामचंद्र शिवराम कांबळे (खंडाळा), चिमाजी रोकडे बाबा (देहू रोड), नामदेव मोरे, शंकर बाळकृष्ण घोलप (जवण) हे त्यापैकीच बाबासाहेबांचे निष्ठावान शिलेदार होते.

या भूमीत बुद्ध-धम्म-संघाचं अधिष्ठान पुनश्च एकदा रुजवता येईल. थांबलेलं धम्मचक्र अडीच हजार वर्षानंतर पुन्हा एकदा गतिमान होईल त्यासाठी पुनश्च शैक्षणिक आणि धार्मिक बीज अंकुरित करण्यासाठी ही भूमी अनुरूप आहे अशी बाबासाहेबांची धारणा होती. बौद्धकालीन नालंदा, तक्षशिला, विक्रमशिलासारखे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ इथं स्थापन करण्याचं त्याचं स्वप्न होतं. प्रेम, आदर आणि करुणेची मनुष्यमात्रांच्या बंधुत्वासाठी शिकवण देणारं ज्ञानपीठ अभिप्रेत होतं… असं इथे त्यांना भेटलेले कार्यकर्ते, अनुयायी सांगतात.

या प्रेरणादायी परिसरात तळेगाव हद्दीतली सर्व्हे क्र. 700 ते 704 पर्यंत सलग 65 एकर जमीन 26 नोव्हेंबर 1948 रोजी अ. 16000 आणि वडगाव-कातवी येथे सर्व्हे क्र. 501 ची बावीस एकर जागा बाबासाहेबांनी आठ हजार रुपयाला खरेदी केली. एकूण 87 एकर जागेचे दस्तऐवज बाबासाहेबांच्या नावे वडगाव तहसील कार्यालयात नोंदले गेले. या जमिनीवर एक जुना कौलारू बंगला होता. त्यात एक व्हरांडा, दोन बैठक खोल्या, एक स्वयंपाकगृह होते. बाबासाहेबांनी विस्तार करून दोन खोल्या व एक व्हरांडा 1947 साली बांधला. बंगल्याच्या कमानीजवळ गुलाब, चमेली, बोगन वेलीची रंगीबेरंगी मनोहारी बाग केली. बंगल्याचे एकूण क्षेत्रफळ 3’500 चौरस फूट आहे. बंगल्याशेजारी पाण्याची विहीर होती. उन्हाळ्यात ती कोरडी पडायची. बाबासाहेबांनी जागेची आणि बंगल्याची रखवाली करण्याची संपूर्ण जबाबदारी लिंबाजीचे चिरंजीव दत्तोबा गायकवाड यांच्यावर सोपविली होती.

या बंगल्यात बाबासाहेबांचं वरचेवर वास्तव्य असायचं. त्यांना पाहण्याची उत्सुकता परिसरातल्या मंडळींना होती. जनसंपर्क वाढत गेला. मदतीचा हात पुढे आला. विहीर बांधकामात ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली. चिमाजी बाबा रोकडे, दशरथ भालेराव, शंकर जाधव, लक्ष्मण वाघमारे अशा मंडळींशी मैत्री दृढ होत गेली. बघता बघता उजाड-निर्जन एकाकी वाटणारा बंगला बहरला, फुलला… ‘डॉ. बाबासाहेबांचा बंगला’ म्हणून ओळखला जाऊ लागला… तळेगावच्या भेटीत बाबासाहेब कार्यकर्त्यांना उपदेश करायचे, ‘मंडळी, जगात सार्या प्रकारच्या क्रांत्या होत राहतील. धार्मिक क्रांती होईल, राजकीय होईल. पण मी सांगतो की पायाभूत क्रांती फक्त शैक्षणिक क्रांतीच करू शकते. जसजसा शिक्षणाचा प्रचार-प्रसार होईल तसतसा वर्णभेद, जातीभेद या गोष्टी कमी होत जातील. मला या भूमीत नेमकं हेच घडवायचं आहे.’ अशा सुस्पष्ट विचारांमुळे बाबासाहेबांना या भूमीचा वापर केवळ शैक्षणिक संकुलासाठीच करायचा होता, हे मात्र निश्चित! त्यांच्या सहवासात ग्रामस्थ आनंदून जात. त्यांना पाहून जमलेल्यांचं हृदय भरून येई.

बाबासाहेब आल्यावर काशीबाई त्यांना निरांजन लावून ओवाळत. अशावेळी सर्वांना भाजी-भाकरीची मेजवानी ठरलेली असायची. विलायतेहून आलेले बाबासाहेब, काटे-चमच्यांनी खायची त्यांना सवय. पण काशीबाईंच्या हातची चुलीवरची भाकर, त्यावर वाढलेली मेथीची भाजी, लसणाची चटणी उभ्या उभ्याच हातावर घेऊन खाताना त्यांना आनंद वाटायचा. समाजाचा उद्धार करणारा हा युगपुरुष कधी भुकेला राहू नये म्हणून हे दोघे पती-पत्नी तळहातावरील फोडाप्रमाणे बाबासाहेबांची काळजी घ्यायचे.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हा बंगला अनुयायांच्या विस्मृतीत गेला. बाबासाहेबांचा हा बंगला विदर्भातील भीमसैनिक किसन थूल यांनी आठ वर्षे न्यायालयीन लढा लढून शोधून काढला. चंद्रपूर जिल्ह्यातील किसन थूल यांच्या पत्नी माधुरी या तळेगाव येथे शिक्षिका आहेत. त्यांना एका ग्रामस्थाकडून बाबासाहेबांचा बंगला असल्याची माहिती मिळाली. ही माहिती त्यांनी पती किसन यांना सांगितली. आपला नोकरीचा प्रपंच सांभाळून थूल यांनी बाबासाहेबांचा बंगला आणि शेतजमीन तळेगाव दाभाडे येथे असल्याची माहिती जगासमोर आणली.

शहा-ऍल्टोनो कॉलनीमधील प्लॉट क्र. 35 वर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या नावाने 1956 ते 1959 बंगल्याची नोंद आहे. त्यानंतर ही जागा डिमेलो डिसुझा यांच्या मालकीची झाली. बाबासाहेबांचा बंगला मिळवायचाच असा दृढनिश्चय थूल यांनी केला. 2004 पासून त्यांनी सर्व कागदपत्रे गोळा केली. 26 जानेवारी 2006 रोजी त्यांनी सत्तर लोकांच्या उपस्थितीत पहिली बैठक घेतली. त्यानंतर मित्रांच्या मदतीने ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती’ची स्थापन केली. 2012 पर्यंत ते न्यायालयीन लढा लढले. अखेर न्यायालयाला बाबासाहेबांचा बंगला असल्याचे मान्य करावे लागले आणि 26 एप्रिल 2012 रोजी बंगला बाबासाहेबांचा नावे करण्यात आला. निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर व्हावे म्हणून नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात आला.

स्मारक समितीनेच धम्मदानातून बाबासाहेबांच्या बंगल्याचे नूतनीकरण करण्याचा संकल्प केला. बंगल्यात बाबासाहेबांचे जीवनदर्शन पाहून मनविहार सुखावून जाते. याशिवाय तथागत बुद्ध, प्रजापिता सम्राट अशोक, सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे यांच्याही आकर्षक प्रतिमा आहेत. बंगल्याच्या प्रांगणात बाबासाहेब आणि मातोश्री रमाबाई यांचा अर्धकृती पुतळा बसविला आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या खर्च समितीच्या अध्यक्षा ऍड. रंजनाबाई भोसले यांनी उचलला आहे. तळेगाव दाभाडे येथे उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा हा पहिलाच पुतळा आहे. आज या स्मारकाला देशातील विविध भागातून बाबासाहेबांचे अनुयायी भेट देत आहेत. आपल्या मुक्तीदात्याच्या वास्तुचे दर्शन घेऊन प्रेरणा घेत आहेत. स्मारकात अभ्यासिका असून स्थानिक विद्यार्थी रात्रं-दिवस अभ्यास करीत आहेत. बाबासाहेबांनी बांधलेल्या पावन वास्तुत अभ्यास करून खर्या अर्थाने हे विद्यार्थी या महामानवाला अभिवादन करीत आहेत.

बाबासाहेबांच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा जतन करणार्या तळेगाव दाभाडे येथील बंगल्याची दुरुस्ती व सुशोभिकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाने 1 कोटी 11 लाख 76 हजार 674 रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे. उशिरा का होईना महाराष्ट्र सरकारला या वास्तुची आठवण व्हावी ही अभिमानाची बाब आहे. बाबासाहेबांची सर्वत्र अनेक स्मारके होत आहेत. बाबासाहेबांच्या स्वप्नातील या जागेचा उपयोग विद्यादानासाठी झाल्यास ती बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. शासन याचा सकारात्मक विचार करून योग्य पाऊल टाकेल अशी आशा आहे.

(मिलिंद मानकर, नागपूर, बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचे संग्राहक)