अमेरिकेचा कोविड चाचणी कार्यक्रम ब्राझील, चीन व भारत यांच्यापेक्षाही मोठा असून देशात जगातील सर्वात कमी मृत्युदर आहे, असा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेत ३३ लाख लोकांना संसर्ग झाला असून १ लाख ३५ हजार लोक  मरण पावले आहेत, त्यामुळे कोविड १९ चा फटका अमेरिकेला सर्वाधिक बसला आहे. फ्लोरिडा, टेक्सास व कॅलिफोर्निया यासारखी राज्ये अजूनही करोनाला काबूत आणण्यासाठी धडपडत आहेत.

ट्रम्प यांनी सांगितले की, जास्त चाचण्या केल्यामुळे अमेरिकेत रुग्णांची संख्या अधिक  आहे पण जगात अमेरिकेतील मृत्युदर सर्वात कमी आहे. आम्ही इतरांपेक्षा जास्त चाचण्या केल्या. जेवढय़ा चाचण्या जास्त तेवढे रुग्ण जास्त. काही देशात लोक रुग्णालयात आल्यानंतर किंवा आजारी पडल्यानंतर चाचण्या केल्या जातात त्यामुळे तेथे रुग्ण संख्या कमी आहे. आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आमच्याकडचे उपचार व्यवस्थित आहेत, लवकरच मी काही चांगली माहिती तुम्हाला सांगेन. भारतात जर अमेरिकेप्रमाणे चाचण्या झाल्या तर जास्त रुग्ण दिसतील. ब्राझीलची अवस्था वाईट आहे त्यांनी पुरेशा चाचण्या केलेल्या नाहीत. आम्ही ४५ दशलक्ष चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या जास्त आहे.

चीनबाबत विचारले असता ते म्हणाले की, चीनने जगाला संकटाच्या खाईत लोटले. जग हे कधीच विसरणार नाही. हा चीनचा प्लेग आहे. त्याला तुम्ही चिनी विषाणूही म्हणू शकता. त्याची किमान वीस नावे आहेत. चीनला त्यासाठी जबाबदार धरले पाहिजे.