भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडून वेगळ्या मार्गाने जाण्याच्या विचारात असलेल्या संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दूरध्वनी केला. वेगवेगळ्या राज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या साह्याने नवी आघाडी उघडण्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली. बॅनर्जी यांनी ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासोबतही दूरध्वनीवरून चर्चा केली.
काही दिवसांपूर्वीच बॅनर्जी यांनी प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन नवी आघाडी काढण्याचे सुतोवाच केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी या दोन्ही मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करून पुढचे पाऊल टाकले. बॅनर्जी म्हणाल्या, नितीशकुमार यांच्यासोबत माझे बोलणे झाले. आपण एकत्र येऊन नवीन आघाडी उघडली, तरी नक्कीच त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल, असे नितीशकुमार म्हणाले. वेगवेगळ्या राज्यातील प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी आम्ही सगळे बोलणार आहोत. पटनाईक यांच्यासोबतही माझे बोलणे झाले. आता आम्ही प्रत्यक्ष भेटून बोलण्याचे ठरवले आहे.
नव्या आघाडीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर सध्या मी समाधानी आहे. काही दिवसांपूर्वी झारखंडमधील नेते बाबूलाल मरांडी यांनी माझी भेट घेतली होती. अजून दोन-तीन नेत्यांशी मी चर्चा करणार आहे.