महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आत्ता करोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे करोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली करोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यास त्यांनाही महाराष्ट्रातली परिस्थिती सांगणार आहे. सध्या राज्यात काय चाललं आहे.. काय झालं पाहिजे यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- “आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा होईल असा विचार करा”; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की ही भेट राजकीय मुळीच नव्हती. ठाकरे सरकार पाडण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही. हे सरकार तीन पक्षांच्या अंतर्विरोधाने कोसळणार आहे. जेव्हा हे सरकार कोसळेल तेव्हा काय करायचं ते पाहू. आज मी अमित शाह यांना भेटलो यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. करोनाची महाराष्ट्रातली स्थिती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती या दोन गोष्टी मी त्यांच्याशी बोललो.

आणखी वाचा- “शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार समजताच शांत बसले”

राजस्थानात जे काही घडलं त्यावरुन तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला असं जेव्हा फडणवीस यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की महाराष्ट्रातला माणूस आहे. देशात काय चालतं, राज्यांमध्ये काय चालतं ते ठाऊक नाही. मी महाराष्ट्रातला नेता आहे. साखरेशी संबंधित विषयात शरद पवार यांचं नाव पुढे आलं नाही असं विचारलं असता शरद पवार त्यांचं काम करत आहेत आणि आम्ही आमचं काम करत आहोत असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- युद्ध असलं तरीही निवडणुका घ्या, करोना सरकारचं नाटक- प्रकाश आंबेडकर

आज दिल्लीत जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. या चर्चेचे विषय महाराष्ट्रातली करोनाची स्थिती आणि शेतकऱ्यांना करायची मदत असे होते. यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. तसंच महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कुठलंही स्वारस्य नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.