केरळमधील राजकीय हल्ले आणि हत्या सत्रांवरून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्री विजयन यांच्यावरच शाब्दिक हल्ला चढवला आहे. राज्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १२० हून कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाल्या आहेत. त्याला मुख्यमंत्री विजयन थेट जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. भाजपतर्फे आजपासून जनसुरक्षा यात्रा काढण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या विरोधात ही यात्रा काढण्यात आली असून त्यात शहा सहभागी झाले आहेत. अमित शहांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चाला जनसुरक्षा यात्रा असे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या पयान्नूर शहरातून या यात्रेला सुरुवात झाली आहे.

भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या घटनांवरून शहा यांनी मुख्यमंत्री विजयन यांना लक्ष्य केले आहे. भाजप आणि आरएसएसच्या १३हून अधिक कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या विरोधात आम्ही ही जनसुरक्षा यात्रा काढली आहे, असे शहा यांनी सांगितले. केरळात जेव्हा-जेव्हा कम्युनिस्ट आघाडीचे सरकार आले आहे, तेव्हा येथे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यात भाजप आणि संघाच्या १२० हून अधिक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत, त्याला मुख्यमंत्री विजयन जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. कार्यकर्त्यांच्या निर्घृण हत्यांवर देशभरातील मानवाधिकार संघटनांचे ‘चॅम्पियन्स’ गप्प का, असा सवालही त्यांनी केला. उद्यापासून १६ ऑक्टोबरपर्यंत दिल्लीतही भाजपचे कार्यकर्ते पदयात्रा काढतील. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासमोर धरणे धरतील, अशी माहितीही शहा यांनी दिली.

दरम्यान, आजपासून १५ दिवस ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत अनेक नेते सहभागी होणार आहेत. स्मृती इराणी, गिरिराज सिंह, धर्मेंद्र प्रधान, अनंत कुमार, राजवर्धन राठोड, व्ही. के. सिंह आदी सहभागी होणार असून उद्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही या यात्रेत भाग घेतील, असे सांगण्यात येत आहे.