11 December 2017

News Flash

सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेणाऱ्यांना देश माफ करणार नाही

२९ व्या स्वातंत्र्यवीर साहित्य संमेलनाचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे | Updated: April 22, 2017 2:47 AM

भाजप अध्यक्ष अमित शहा. ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार प्रेरणादायी होते. त्यांच्या इतकी प्रखर देशभक्ती क्वचितच पाहायला मिळते असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज २९ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या  विचारधारेबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात परंतु त्यांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेणाऱ्यांना हा देश कधीही माफ करू शकणार नाही असे त्यांनी यावेळी म्हटले.

ठाणे येथील साहित्य संमेलनात शहा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र सांगितले. सावरकरांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते परंतु त्यांनी कधीही वकिली केली नाही. कारण त्यांच्याकडे सनद नव्हती. सनद हवी असेल तर इंग्लंडच्या राणीसोबत प्रामाणिक राहण्याची शपथ घ्या असे त्यांना म्हटले गेले होते. परंतु त्यांनी ही प्रतिज्ञा घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना वकिली करता आली नाही असे शहा म्हणाले.

सावरकरांच्या त्यागाची कल्पना आपण करू शकत नाही असे ते म्हणाले. आपल्या देशामध्ये अनेक पद्मश्री आणि पद्मभूषण आहेत परंतु आपल्या नावापाठीमागे स्वातंत्र्यवीर ही पदवी असलेले सावरकर हे एकमात्र आहेत असे शहा म्हणाले. अंदमान निकोबार येथील तुरुंगात सावरकरांच्या आठवणी प्रित्यर्थ सुरू करण्यात आलेली क्रांती ज्योती काँग्रेसच्या काळात बंद करण्यात आली होती. भाजपचे सरकार आल्यानंतर क्रांती ज्योती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही क्रांती ज्योती देशवासियांनी राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल असे शहा यांनी म्हटले. देशासाठी प्राणांची आहुती देण्यासाठी मागेपुढे न पाहणारा एक योद्धा अशी त्यांची ख्याती होती.

सावरकरांनी सामाजिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केली आहे. समाजातील अस्पृश्यता संपुष्टात यावी या करता सावरकर लढले होते. समाजातील भेदभाव नष्ट येऊन सर्वांनी एकत्रितपणे गुण्या-गोविंदाने राहावे यासाठी सावकरांनी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हे अनन्यसाधारण तर होतेच परंतु त्यांची भाषेच्या क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय आहे असे शहा म्हणाले. सावरकरांचा अनेक भाषांचा अभ्यास होता. अनेक महत्त्वपूर्ण इंग्रजी शब्दांना हिंदी किंवा मराठी पर्याय उपलब्ध करुन देण्याचे काम सावरकरांनी केले आहे असे शहा म्हणाले.

First Published on April 21, 2017 7:38 pm

Web Title: amit shah inaugurates swatantryaveer savarkar literature festival