मेक्सिको वगळता इतर प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयावर मतैक्य झाले आहे. ओपेक या तेल उत्पादक व निर्यातदार देशांची बैठक होऊन त्यात जुलैपर्यंत  तेलाचे उत्पादन दर दिवशी १ कोटी पिंपे व वर्षअखेरीपर्यंतच्या काळात ८० लाख  पिंपांनी कमी करण्यावर  मतैक्य झाले. पण त्याला मेक्सिकोने मान्यता दिलेली नाही.

ओपेक व रशियासह काही मित्र देश यांची आभासी बैठक गुरुवारी झाली. तेलाचे दर दोन दशकातील नीचांकी होत आले असून घसरण रोखण्यासाठी तेलाचे उत्पादन कमी करणे गरजेचे आहे, पण मेक्सिकोने त्यासाठी मान्यता देणे गरजेचे आहे. मेक्सिकोने त्यांच्या वाटय़ाचे तेल उत्पादन दिवसाला चार लाख पिंपानी कमी करणे गरजेचे आहे.

मेक्सिकोच्या  ऊर्जा मंत्री रोसिओ नहले गार्सिया यांनी सांगितले, आम्ही दिवसाला १ लाख पिंपे उत्पादन कमी करण्यास तयार आहोत. मार्चपर्यंत मेक्सिकोने १७ लाख पिंपे उत्पादन केले आहे.  दिवसाला १ कोटी पिंपे तेल उत्पादन घटवण्याचा सौदी अरेबिया आणि रशियाचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे असे व्हेनेझुएलाने म्हटले आहे.

जगातील टाळेबंदीमुळे तेलाचे दर घटले असून जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. इतर देशांनी उत्पादन कमी केले तरच आम्हीही कमी करू अशी भूमिका सौदी अरेबिया व रशिया यांनी घेतली आहे.