सशस्त्र दलात एकूण ११ हजारांहून अधिक अधिकाऱ्यांची कमतरता असून, लष्करात मोठय़ा प्रमाणावर अधिकाऱ्यांची वानवा आहे, असे मंगळवारी राज्यसभेत सांगण्यात आले.
लष्कराला नऊ हजार ६४२ अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. अधिकृत प्रमाणात वाढ झाल्याने अधिकाऱ्यांच्या कमतरतेमध्ये वाढ झाली आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी उत्तरात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे नौदलात एक हजार ३२२ अधिकाऱ्यांची आणि हवाई दलात १५२ अधिकाऱ्यांची कमतरता आहे. एकूण ११ हजार ११६ अधिकाऱ्यांची कमतरता आहे. या आकडेवारीमध्ये वैद्यकीय आणि दंतवैद्यक शाखेतील कमतरतेचा समावेश करण्यात आलेला नाही, असेही पर्रिकर यांनी म्हटले आहे.
सशस्त्र दलातील नोकऱ्यांबाबत आकर्षण वाटावे यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत. त्यामध्ये सहाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार वेतन रचना, बढतीच्या संधी आदींचा समावेश आहे, असेही पर्रिकर यांनी म्हटले आहे.