22 January 2021

News Flash

लष्कराचे ‘यमुना पर्यटन’ कुणाच्या दबावावरून ?

संसदेत टीका, यमुनेकाठी सांस्कृतिक महोत्सवाच्या मुद्दय़ावर हरित लवादाने फटकारले

| March 10, 2016 01:57 am

संसदेत टीका, यमुनेकाठी सांस्कृतिक महोत्सवाच्या मुद्दय़ावर हरित लवादाने फटकारले
आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना यमुनेच्या पर्यावरण संवेदनशील असलेल्या पूर पठारांच्या भागात ११ ते १३ मार्चदरम्यान सांस्कृतिक महोत्सव घेण्यास परवानगी दिली नव्हती, असा खुलासा केंद्रीय जलसंपत्ती मंत्रालयाने केला आहे. सरकारने मात्र संसदेत श्री श्री रवीशंकर यांनी सर्व परवाने घेतले होते व बेकायदेशीर काही केलेले नाही, असे सांगितले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या महोत्सवासाठी जाण्याचे टाळल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. राष्ट्रीय हरित लवादाला सरकारने सांगितले की, आम्ही या कार्यक्रमास परवानगी दिलीच नव्हती. राज्यसभेतही विरोधी पक्षांनी या खासगी कार्यक्रमासाठी भारतीय लष्करी दलांची मदत देऊ केल्याबद्दल सरकारवर चौफेर टीका केली.
राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे की, श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने आयोजित केलेल्या या महोत्सवाने पर्यावरणाची हानी होणार आहे, तरीही पर्यावरण परवान्यांच्या संदर्भात सरकारने कुठलेही प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. या कार्यक्रमाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याचे मूल्यमापन केले होते का, अशी विचारणा हरित लवादाने दिल्ली सरकार, केंद्र सरकार व दिल्ली विकास प्राधिकरण यांना केली आहे.

विरोधकांची चौफेर टीका
दरम्यान, विरोधी पक्षांनी राज्यसभेत सरकारला याप्रकरणी फैलावर घेतले असून रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या खासगी कार्यक्रमासाठी सरकारने लष्कराची मदत कशाच्या आधारे देऊ केली, असा प्रश्न केला आहे. यमुनेची पठारे पर्यावरण संवेदनशील असून पर्यावरण सुरक्षेसाठी श्री श्री रवीशंकर हे वचनबद्ध असल्याचे सांगत सरकारने त्यांचे समर्थन केले आहे. या कार्यक्रमाला सर्व परवाने देण्यात आले होते शिवाय हा प्रश्न हरित लवादापुढे असल्याने संसदेत उपस्थित करण्याचे कारण नाही, असा पवित्रा सरकारने घेतला पण विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सभापतींच्या आसनासमोर धाव घेत घोषणाबाजी केली, त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. जनता दल संयुक्तचे शरद यादव, काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी नियम २६७ अन्वये कामकाज थांबवून या विषयावर चर्चेची मागणी केली. त्यानंतर शून्य प्रहरात हा प्रश्न उपस्थित करण्यास मान्यता देण्यात आली.

लवादाने खर्चाचा तपशील मागितला
दिल्ली सरकारने याबाबत केंद्र सरकारच्या जलसंवर्धन विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांकरिता वेगळा मंच उभारण्यास आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला सांगितले होते. हरित लवादाने आर्ट ऑफ लिव्हिंगला मंच तयार करणे, पूर पठारांचे सपाटीकरण करणे, ढीग उपसणे यासाठी किती खर्च करण्यात आला याचा तपशील मागवला आहे. तरंगता पूल सुरक्षा, वाहन पार्किंग परवाना याबाबत दिल्ली सरकारने आर्ट ऑफ लिव्हिंगला विचारणा केली होती, असे हरित लवादाला सांगण्यात आले.

लष्कराची मदत कशासाठी?
शरद यादव यांनी सांगितले की, यमुना किनारी आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे, कुणाच्या दबावाखाली भारतीय लष्कर तेथे केवळ एका व्यक्तीसाठी झुलता पूल बांधण्यासाठी पाठवण्यात आले. रवीशंकर असा कुठला कार्यक्रम करणार आहेत. ते काय तेथे तमाशा करणार आहेत का, असा प्रश्न यादव यांनी केला. सभागृहात नसलेल्या व्यक्तीवर टीका करू नका, असे उपाध्यक्ष कुरियन यांनी सांगितले. माकपचे सीताराम येचुरी यांनी सांगितले की, खासगी कार्यक्रमासाठी लष्कराची मदत कशी देण्यात आली.. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रवीशंकर यांचे समर्थन करताना त्यांनी सर्व परवाने घेतले होते व बेकायदा काहीही नाही असे स्पष्ट केले. दरम्यान, राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी राज्यसभेत शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चालू असताना सतत बोलण्याचा प्रयत्न करणारे ऊर्जामंत्री पीयूष गोयल, भाजप सदस्य व्ही. पी. सिंह बडनोरे यांना चार खडे बोल सुनावले.

राजकारण करू नका – श्री श्री रवीशंकर
राजकीय पक्षांनी जागतिक सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रश्नावर राजकारण करू नये, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवीशंकर यांनी केले आहे. सर्व संस्कृती, देश, धर्म, विचारसरणी यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पर्यावरणाबाबत आपण संवेदनशील आहोत, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 1:56 am

Web Title: army seethes at deployment in sri sri ravi shankar festival
Next Stories
1 अद्याप हिलरी क्लिंटन यांना संमिश्र यश
2 चीनमधील जोडप्याकडून आयफोनसाठी मुलीची विक्री
3 अमेरिकेचा दबाव झुगारून इराणच्या क्षेपणास्त्र चाचण्या
Just Now!
X