कथित घोटाळ्याच्या तपासावर ‘आप’ ठाम
दिल्ली क्रिकेट संघटनेतील कथित घोटाळा प्रकरणात काही आजी-माजी क्रिकेटपटूंनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची पाठराखण केली. या कथित घोटाळ्यास जेटली यांना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे या क्रिकेटपटूंनी सांगितले.
जेटली १३ वर्षे दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित घोटाळ्याची चौकशी करावी व त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे. विशेषत आम आदमी पक्षाने ‘जेटली हटाव’ मोहीमच सुरू केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापा टाकल्यानंतर तर ही मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या जेटली यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकर क्रिकेटपटू पुढे आले आहेत. एकीकडे भाजपचे खासदार व माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी या कथित घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरलेली असताना वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, इशांत शर्मा यांनी जेटलींची पाठराखण केली. खेळाडूंच्या समस्या सोडविण्यात ते तत्पर होते, अशा शब्दांत जेटली यांचे कौतुक करत सेहवागने या प्रकरणात राजकीय भाष्य करण्याचे टाळले. दरम्यान, या कथित घोटाळ्याची चौकशी दडपण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिला. कथित घोटाळ्याच्या फायली दिल्ली सरकारला देणाऱ्या क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्याचे नाव उघड करण्यासाठी सीबीआयने राजेंद्र कुमार यांना धमकावल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, या अधिकाऱ्याचे नाव उघड न केल्यास कारकीर्द संपुष्टात आणण्याची धमकी राजेंद्र कुमार यांना देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्याने सहकार्य केल्यास त्याच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्यात येतील व दिल्लीच्या नायब राज्यपालांमार्फत कथित घोटाळ्याची चौकशी थांबविण्यात येईल, अशा आशयाची जेटली यांची टिप्पणी या फाईलमध्ये आहे. राजेंद्र यांच्या चौकशीस ‘आप’ने हरकत घेतलेली नाही. परंतु, कथित घोटाळ्याची चौकशी दडपण्याचे प्रयत्न मात्र हाणून पाडण्यात येतील.

भाजप खासदाराचे कृत्य..
या प्रकरणात आपल्याला अडकविण्यासाठी भाजपच्या एका खासदाराने संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कार्यकाळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचा दावा जेटली यांनी केला. त्यांनी या खासदाराचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख भाजप खासदार कीर्ती आझाद यांच्यावर होता. आझाद यांनी मात्र आरोप फेटाळून लावले. आपल्यावरील आरोप निराधार असून ते करणाऱ्या व्यक्तीचेच सर्वपक्षीय संबंध असतील. काँग्रेसशी संगनमत करून जर मी कुणाला तरी अडकविण्याचा प्रयत्न केला, असे त्याला वाटत असेल, तर त्याच सरकारच्या काळात माझ्या भावाला निलंबित व्हावे लागले होते. याबाबतीत वस्तुस्थिती तपासून घ्यावी, अशा शब्दांत त्यांनी आपली बाजू मांडली.
गौतम गंभीरने मात्र या कथित घोटाळ्यात जेटली यांना गोवणे चुकीचे असल्याचे ट्वीट केले. आता टीका करणाऱ्या लोकांना जेटली यांच्या कृपाशीर्वादामुळेच संघटनेत मोक्याची पदे मिळाली होती. त्यांच्या कार्यकाळात संघटनेची प्रगती झाली, असे मत गंभीरने व्यक्त केले.