दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱया आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मनिष सिसोदियाही उपस्थित होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी या दोघांनी त्यांची भेट घेऊन सुमारे दहा मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली. ही भेट सकारात्मक झाल्याचे मनिष सिसोदिया यांनी पत्रकारांना सांगितले.
केजरीवाल यांनी ‘कलंकित पैसा’ स्वीकारला – शांती भूषण
भेटीमध्ये पंतप्रधानांकडेही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. याआधी केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडेही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती.
BLOG : सामर्थ्य आहे आंदोलनाचे…जो जे करील त्याचे!
विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठे यश मिळवल्यानंतर मंगळवारीच मोदींनी केजरीवाल यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळीच त्यांनी केजरीवाल यांना भेटण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता हे दोघेही भेटले. भेट झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. त्यानंतर दोघांमध्ये दहा मिनिटे दिल्लीतील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. येत्या शनिवारी होणाऱया शपथविधी सोहळ्यासाठीही केजरीवाल यांनी मोदींना निमंत्रण दिले. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नसल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यावर केंद्र सरकार विचार करेल, असेही त्यांनी सांगितल्याचे सिसोदिया म्हणाले. केजरीवाल आणि सिसोदिया यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेतली होती.