News Flash

“जर चिनी सैन्याने घुसखोरी केलीच नाही, तर आता माघारी का जात आहेत?”; ओवेसींचा सवाल

भारत चीन डी अ‍ॅक्सलेशनवरुन ओवेसींचे सरकारला तीन प्रश्न

प्रातिनिधिक फोटो

लडाखमधून चिनी सैन्याने माघार घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर लोकसभेचे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सोमवारी ओवेसी यांनी ट्विटरवरुन एक ट्विट करत चिनी सैन्य मागे सरकत असल्याच्या बातमीवरुन काही प्रश्न विचारले आहेत. चीनने डी अ‍ॅक्सलेशन सुरु केलं आहे याचा अर्थ काय?, असं ओवेसींनी विचारलं आहे. तसेच जर कोणी आपल्या देशामध्ये घुसखोरी केलीच नव्हती तर ते परत कसे जात आहेत?, असा प्रश्नही त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अधिकृत वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विचारला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी समोवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल आणि चिनीचे स्टेट काउन्सिलर वांग यी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण परिस्थिती परस्पर सहकार्याने निवळण्यासाठी दोन्ही देशातील जवानांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन माघारी घेण्यात येण्यासंदर्भात चर्चा झाली. भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांमध्ये डी अ‍ॅक्सलेशन प्रक्रियेद्वारे शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात या अधिकाऱ्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. यासंदर्भातील अधिकृत पत्रकही नंतर प्रसिद्ध करण्यात आलं.

याचवरुन आता ओवेसींनी तीन प्रश्न उपस्थित केले आहे. ट्विटवरुन एएनआयने पोस्ट केलेल्या अधिकृत वक्तव्यावर ओवेसींनी प्रतिक्रिया देताना मला तीन शंका आहेत असं म्हणतं ट्विट केलं आहे. ओवेसींनी उपस्थित केलेले प्रश्न पुढील प्रमाणे…

१) चीनला जे हवं होतं ते त्याला देण्यात आलं आहे असा डी अ‍ॅक्सलेशनचा अर्थ घ्यावा का?

२) पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोणीही घुसखोरी केली नाही आणि कोणताही घुसखोर नाहीय” मग हे डी अ‍ॅक्सलेशन कसलं?

३) आपण चीनवर विश्वास का ठेवत आहे, त्यांनी तर ६ जून रोजीही डी अ‍ॅक्सलेशनसाठी सहमती दर्शवली होती ना?

आणखी वाचा- गलवानमधून सैन्य मागे हटल्यानंतर राहुल गांधींनी सरकारला विचारले तीन प्रश्न

भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमधील तणावामुळे गेले आठ आठवडे पेच सुरू असून पँगॉग त्सो, गलवान खोरे, गोग्रा हॉट स्प्रिंग या ठिकाणी चीनच्या सैन्याने घुसखोरी केली होती. चीनच्या लष्कराने सोमवारी सीमेवरून माघारी सुरू केली असून गलवान खोरे व गोग्रा हॉट स्प्रिंग भागातून सैन्य माघारी घेण्यास चीनने सुरुवात केली आहे. डोवालल व वँग यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करण्याचे आश्वासन एकमेकांना दिले असून जैसे थे परिस्थिती बदलण्यासाठी कुठलीही एकतर्फी कृती न करण्याचे मान्य करण्यात आले आहे. आगामी काळात कुठलाही हिंसक प्रसंग होऊ न देता शांतता पाळण्याचेही मान्य करण्यात आले. ३० जून रोजी भारत व चीन यांच्या लष्करादरम्यान लेफ्टनंट जनरल पातळीवर चर्चेची तिसरी फेरी झाली होती. त्यात टप्प्याटप्प्याने सैन्य माघारी घेण्याचे ठरले होते.

आणखी वाचा- PoK मध्ये चीनविरोधात निदर्शन, लोकांनी रस्त्यावर उतरुन दिल्या घोषणा

लेफ्टनंट जनरल पातळीवरील चर्चेची पहिली फेरी  ६ जूनला झाली होती, पण त्यात सैन्य माघारीवर मतैक्य होऊनही १५ जूनला चिनी सैन्याने गलवान भागात हिंसक चकमक केली त्यात भारताचे वीस जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर दोन्ही देशात तणाव आणखी वाढून मोर्चेबांधणी करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 1:24 pm

Web Title: asaduddin owaisi has three questions about indo china de escalation asks what does it mean scsg 91
Next Stories
1 VIDEO: रात्रीच्या अंधारात भारत-चीन सीमेजवळ ‘मिग-२९’, ‘अपाचे’ची गर्जना
2 “माझी कदाचित हत्या होईल”, करोनाबाधित पत्रकाराचा आत्महत्येपूर्वी मेसेज; आरोग्यमंत्र्यांचा चौकशीचा आदेश
3 शायना एनसी यांची प्रसारभारतीच्या मंडळावर निवड
Just Now!
X