आसाममधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्राचाराचे वारे वाहू लागले आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा या सोमवारपासून दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी त्यांनी सधारु टी स्टेट या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी यावेळी चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी तेथील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत चहाच्या पानांची तोडणी केली. दर निवडणुकीला येथील चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे मजूर हे निवडणुकीमधील मुख्य मुद्द्यांपैकी एक असतात. आजच प्रियंका यांची तेजपूरमध्ये एक प्रचारसभाही होणार आहे.

नक्की पाहा फोटो >> Photos: प्रियंकांचा हटके प्रचार; कामाख्या मंदिरापासून ते चहाच्या मळ्यांपर्यंत

प्रियंका यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवारी प्रियंका यांनी कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये पूजा करुन दौऱ्याला सुरुवात ेकली होती. आसाममध्ये १२६ सदस्यांची विधानसभा असून येथे २७ मार्च, एक एप्रिल आणि सहा एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

सोमवारी प्रियंका या सर्वात आधी जलुकबारी परिसरामध्ये थांबल्या. येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलं. त्यानंतर त्या नीलाचल हिल्स येथील शक्तिपीठाकडे रवाना झाल्या. यावेळी प्रियंका यांनी, “मागील बऱ्याच काळापासून मला या मंदिराला भेट द्यायची होती, आज अखेर ती इच्छा पूर्ण झाली. मी स्वत:च्या कुटुंबाबरोबरच आसामी लोकांच्या भल्यासाठी प्रार्थना केली,” असं म्हटलं होतं.

विधानसभा निवडणुकींसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता प्रियंका यांनी पत्रकारांना राजकारणाबद्दल नंतर बोलूयात असं सांगितलं. “मी इथे देवाचे आभार मानन्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी आले आहे. देवाने मला भरपूर गोष्टी दिल्यात,” असं प्रियंका म्हणाल्या. फेसबुकवरही त्यांनी कामाख्या मंदिरातील दर्शनाचे फोटो पोस्ट केले होते.