पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘हुडहुड’ चक्रीवादळाचा आंध्र-ओदिशाला तडाखा बसला असून आतापर्यंत यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  
सकाळी अकराच्या सुमारास विशाखापट्टनममध्ये सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरुवात झाली आणि सुरूवातीला विशाखापट्टनममध्ये ‘हुडुहुड’ वादळाने दस्तक दिली.  या मुसळधार पावसाने दोन जणांचा बळी घेतला. त्यानंतर हे वादळ आंध्र आणि ओदिशामध्ये दाखल झाले आहे.
‘हुडहुड’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या तटवर्ती क्षेत्रात असलेल्या पाच जिल्ह्य़ांतील १.११ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आंध्र प्रदेश सरकारने एकूण पाच लाख १४ हजार ७२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था केली आहे, तर लष्कर आणि नौदलाच्या कर्मचाऱ्यांना मदत आणि बचावकार्यासाठी सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.