अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्या आमंत्रितांना चांदीचं नाणं आठवण म्हणून देण्यात येणार आहे. सर्व आमंत्रितांना देण्यात येणारं हे नाणं खास असणार आहे. या चांदीच्या नाण्याच्या एका बाजूला प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचं छायाचित्र असेल. तर दुसऱ्या बाजूला राम मंदिर ट्रस्टचं चिन्ह असणार आहे.

चांदीच्या नाण्यांव्यतिरिक्त कार्यक्रमासाठी येणाऱ्या आमंत्रितांना एका बंद बॉक्समध्ये लाडूही देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाची भव्यता लक्षात घेत तब्बल १.२५ लाख लाडूंचं वितरण केलं जाणार आहे. यांना रघुपती लाडू म्हणूनही ओळखलं जातंय. हे रघुपती लाडू आमंत्रितांशिवाय अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या भाविकांनाही वाटले जाणार आहेत.

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत. तसंच या कार्यक्रमासाठी देशातील १३५ साधू-संतांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच सर्वांना सुरक्षेच्या कारणास्तव ४ ऑगस्ट रोजीच अयोध्येत पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसंच सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्याची सीमाही सील करण्यात आली आहे.

आज दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. करोना विषाणूच्या  पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केवळ १७५ जणांना या भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.