उत्तराखंडमधील केदारनाथ-बद्रिनाथ ही प्रसिद्ध देवस्थाने आहेत. वर्षभर या ठिकाणी भाविकांची गर्दी पहायला मिळते. या ठिकाणांपर्यंत जाणारे मार्गही डोंगररांगांमधून असल्याने धोकादायक आहेत. पावसाळ्यात या मार्गांवर नेहमीच दरड कोसळण्याचा धोका असतो. अशाच एका चामोली भागात आज दरड कोसळली त्यामुळे बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, रस्त्यावर जमा झालेला राडारोडा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.


गेल्याच आठवड्यात हृषिकेश-बद्रिनाथ महामार्गावर विष्णूप्रय़ाग जवळ दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. त्यामुळे चारधामला निघालेले शेकडो यात्रेकरू अडकून पडले होते. त्यामुळे सुमारे १८०० पर्य़टकांना याचा फटका बसला होता. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हा मार्ग सुरळीत करण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या जवानांनी मोठे प्रयत्न केले, त्यानंतर हा मार्ग खुला होऊ शकला होता. येथिल हाथीपहाड हा भाग यात्रेकरुंसाठी खूपच धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात या मार्गावर नेहमीच दरडी कोसळत असतात.