इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना काल पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. तब्बल १२ तास या कर्मचाऱ्यांची पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली व त्यांचा प्रचंड छळ केला. उच्चायुक्त कार्यालयाजवळील पेट्रोल पंपावरुन या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी दिली.

पाकिस्तानी वेळेनुसार सकाळी ८.३० च्या सुमारास १५ ते १६ सशस्त्र सुरक्षारक्षक सहा गाडयांमधून उतरले व या दोन कर्मचाऱ्यांना गाडीत बसवून आपल्यासोबत घेऊन गेले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. भारतीय दूतावासातील दोन्ही कर्मचाऱ्यांच्या डोळयावर पट्टी बांधण्यात आली होती व त्यांना बेडया घालण्यात आल्या होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली.

ताब्यात घेतल्यानंतर त्यांना दहा मिनिटात एका अज्ञातस्थळी नेण्यात आले. तिथे सहा तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांना रॉडने आणि लाकडी काठीने मारहाण करण्यात आली तसेच अत्यंत घाणेरडे पाणी प्यायला लावले. उच्चायुक्त कार्यालयातील प्रत्येक अधिकाऱ्याची काय भूमिका आहे? तो कसा काम करतो याची माहिती देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.

दुतावासाजवळ या कर्मचाऱ्यांच्या गाडीने एका पादचाऱ्याला धडक दिल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलीय असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांमध्ये देण्यात आले होते. भविष्यात उच्चायुक्त कार्यालयातील अन्य सदस्यांना सुद्धा अशीच वागणूक दिली जाईल अशी धमकी त्यांनी दिल्याचे अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. भारतीय दुतावासातील कर्मचारी बेपत्ता झाल्याचे समजल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून तात्काळ पावले उचलण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास या कर्मचाऱ्यांना भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडे सोपवण्यात आले.