परदेशी महिलेच्या निवासस्थानी घुसण्यामुळे वादात सापडलेले दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती शुक्रवारी दिल्ली महिला आयोगाच्या सदस्यांपुढे हजर झालेच नाहीत. भारती यांनी आपल्या वकिलांना आयोगापुढे युक्तिवाद करण्यासाठी पाठवले. मात्र, आयोगाच्या प्रमुख बरखा सिंग यांनी त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेण्यास स्पष्टपणे नकार दिला.
दक्षिण दिल्लीत राहणाऱया युगांडातील महिलेच्या निवासस्थानी वेश्याव्यवसाय चालत असल्याच्या संशयावरून भारती यांनी आम आदमी पक्षाच्या समर्थकांसह गेल्या आठवड्यात मध्यरात्री छापा टाकला होता. यानंतर संबंधित महिलेने भारती यांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार पोलीसांकडे केली. दिल्ली महिला आयोगाने याप्रकरणी भारती यांना नोटीस बजावली होती. या संपूर्ण प्रकारावरून सोमनाथ भारती यांच्या राजीनाम्याच्या मागणीने गेल्या दोन दिवसांपासून जोर धरला आहे.
भारती यांच्यावर महिला आयोगाने ठेवलेल्या आरोपांबाबत त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना शुक्रवारी दुपारी पाचारण करण्यात आले होते. मात्र, काही तातडीच्या कामामुळे भारती येऊ शकणार नसल्याचे त्यांच्या वकिलांनी आयोगापुढे सांगितले.
भारती यांनी स्वतः आयोगापुढे हजर होऊन स्वतःची बाजू मांडायला हवी होती. त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद आम्ही ऐकून घेणार नाही, असे बरखा सिंग म्हणाल्या.