News Flash

नीता अंबानींनी व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून जॉइन व्हावं, बनारस हिंदू विद्यापीठाचं पत्र; अदानींच्या पत्नीलाही करणार विनंती

हे पत्र पाठवल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरूंनाच नाही

(फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि पीटीआय़वरुन साभार)

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांची पत्नी निता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठामध्ये (बीएचयू) पाहुण्या प्राचार्या (व्हिजिटींग फॅकल्टी) नियुक्त करण्याच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी विरोध केलाय. या निर्णयामधून व्यवस्थापन चुकीचा आदर्श घालून देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मंगळवारी विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात विद्यापीठाचे कुलगुरू राकेश भटनागर यांच्या घरासमोर ४० विद्यार्थ्यांनी आंदोलन करत हा निर्णय मागे घेण्यासंदर्भातील निवेदन कुलगुरूंना दिलं आहे.

बीएचयूमधील सामाजिक शास्त्र विभागाने रिलायन्स फाऊण्डेशनला पाठवलेल्या पत्रामध्ये निता अंबानी यांनी विद्यापीठामधील महिला अभ्यास केंद्रामध्ये पाहुण्या प्राचार्या म्हणून सहभागी व्हावे अशी विनंती करणारं पत्र पाठवलं होतं. विशेष म्हणजे केवळ निता अंबानी यांना पत्र पाठवण्यात आलं असलं तरी विद्यापीठातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिजिटींग फॅकल्टी पदासाठी उर्वरित दोन जागांपैकी एका जागेसाठी उद्योगपती गौतम अदानींची पत्नी प्रिती अदानी यांचा विचार केला जात आहे. तसेच तिसऱ्या जागेसाठी युनायटेड किंग्डममधील भारतीय वंशाचे उद्योजक लक्ष्मी मित्तल यांची पत्नी उषा मित्तल यांच्या नावासंदर्भात विचार सुरु आहे. दोन दशकांपूर्वी बनारस हिंदू विद्यापीठामध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला अभ्यास केंद्रातील व्हिजिटींग फॅकल्टी पदासाठी तीन नियुक्त्या बाकी असून त्यासंदर्भातच या तिघींच्या नावाचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे.

“महिला सशक्तीकरणासंदर्भात आम्ही संशोधन करतो. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आमच्याकडे उपलब्ध आहे. बीएचयूच्या परंपरेनुसार सामजसेवा करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून समावेश करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाऊण्डेशनच्या निता अंबानी यांना महिला अभ्यास केंद्रामध्ये पाहुण्या प्राचार्या म्हणून येण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. त्यांच्या अनुभवाचा आमच्या महिला अभ्यास केंद्राला फायदा व्हावा या हेतूने ही विचारणा करण्यात आलेली. महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रामध्ये रिलायन्स फाऊण्डेशन बरंच काम केलं आहे, त्यामुळेच आम्ही ही विचारणा केली,” असी माहिती सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख असणाऱ्या कौशल किशोर मिश्रा यांनी दिली आहे.

या निर्णयाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक असणाऱ्या शुभम तिवारीने हा निर्णय एखाद्या कटाचा भाग असल्याचं मत व्यक्त केलं आहे. “आपण चुकीचं उदाहरण समोर ठेवत आहोत. श्रीमंत व्यक्तीची पत्नी असणं ही काही वैयक्तिक यश नाहीय. हे लोकं आपले आदर्श असू शकत नाहीत. जर तुम्ही महिला सबलिकरणासंदर्भातील आदर्श व्यक्तींना बोलवण्याचा विचार करत असला तर तुम्ही अरुणीमा सिन्हा, भालचंद्री पाल, मेरी कोम आणि किरण बेदींसारख्या व्यक्तींचा विचार केला पाहिजे,” असं मत सध्या संशोधन करणाऱ्या शुभमने व्यक्त केलं आहे. कुलगुरू भटनागर यांना निती अंबांनीना हे पत्र पाठवल्याची माहिती नसल्याचही शुभमने म्हटलं आहे.

वृत्तानंतर रिलायन्स स्पष्टीकरण

दरम्यान रिलायन्सने हे वृत्तसमोर आल्यानंतर यासंदर्भात खुलासा केला आहे. रिलायन्स उद्योग समूहाने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. “नीता अंबानी या बनारस हिंदू विद्यापीठात मानद प्राध्यापक होणार असल्याचं खोटं आहे. त्यांना अद्याप कोणताही प्रस्ताव विद्यापीठाकडून मिळालेला नाही,” असं रिलायन्स उद्योग समूहाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 10:10 am

Web Title: bhu students protest decision to make nita ambani visiting professor scsg 91
Next Stories
1 भाजपा खासदार शर्मा यांची दिल्लीत गळफास घेऊन आत्महत्या
2 धक्कादायक CCTV! मुलाने कानशिलात लगावली…आईने जागेवरच सोडला प्राण
3 दोन मसाज पार्लरमध्ये अंदाधूंद गोळीबार; आठ जणांचा मृत्यू
Just Now!
X