करोनाचं संकट गहिरं होत असताना एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी सरकारने करोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या २९०० च्या वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ६५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. “सध्या देश एका मोठ्या संकटाचा सामना करतो आहे. अशात फक्त सरकारीच नाही तर खासगी डॉक्टरांनीही करोना विरोधातली लढाई लढण्यासाठी सज्ज व्हावं. देशाला सगळ्यांची साथ हवी आहे. याच अनुषंगाने करोनाची चाचणी आणि उपचार हे आम्ही आयुष्मान भारत PM-JAY योजने अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे” असं त्यांनी म्हटलं आहे.