13 August 2020

News Flash

‘विभक्त’ जनता दल, २१ पदाधिकाऱ्यांची पक्षातून गच्छंती

माजी मंत्री रमई राम आणि माजी खासदार अर्जून राय यांचा समावेश

शरद यादव (संग्रहित छायाचित्र)

बिहारमध्ये संयुक्त जनता दलातील वाद काही शमण्याची चिन्हे नाहीत. नितीशकुमार आणि शरद यादव यांच्यातील मतभेद आणखी तीव्र झाले असून पक्षातील २१ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे बिहारमधील प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी सोमवारी ही कारवाई केली असून हे सर्व पदाधिकारी शरद यादव गटातील होते. कारवाई झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी मंत्री रमई राम आणि माजी खासदार अर्जून राय यांचा समावेश आहे.

गेल्या महिनाभरापासून बिहारमधील राजकारण नाट्यमय घडामोडींनी ढवळून निघाले आहे. नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेतला. महाआघाडीतून बाहेर पडताच नितीशकुमारांनी थेट एनडीएमध्ये प्रवेश केला. भाजपच्या साथीने नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमानही झाले. पण त्यांच्या या निर्णयाने पक्षात फूट पडली.

राज्यसभेतील खासदार शरद यादव यांनी विद्यमान अध्यक्ष नितीशकुमारांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. शरद यादव यांनी सध्या राज्यात पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घ्यायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पक्षाचे बिहारमधील प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी पक्षविरोधी कृत्य केल्याप्रकरणी २१ जणांवर निलंबनाची कारवाई केली. हे सर्व पदाधिकारी शरद यादव गटातील होते असे समजते. रमई राम, माजी खासदार अर्जून राय अशा नेत्यांचा यात समावेश आहे. नितीशकुमार यांच्या गटाने कारवाईला सुरुवात केली असली तरी दुसरीकडे शरद यादव यांचे समर्थकही आक्रमक झालेत. शरद यादव यांना पक्षाच्या १३ राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचे समर्थन असल्याचा दावा यादव समर्थक करत आहेत. याशिवाय राज्यसभेतील २ खासदार, काही आमदार व पक्षातील पदाधिकारी यादव यांना पाठिंबा देणार असल्याचे यादव यांचे निकवर्तीय सांगतात. मतभेद तीव्र झाल्यानंतर नितीशकुमार यांनी शरद यादव यांना पक्षाच्या महासचिव पदावरुन हटवले होते. याशिवाय राज्यसभेच्या गटनेतेपदावरुन यादव यांची उचलबांगडी करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 3:58 pm

Web Title: bihar cm and jdu party chief nitish kumar vashistha narayan singh suspends 21 sharad yadav loyalists from party
Next Stories
1 … आणि तो व्यापारी पत्नी व मुलादेखत जिवंत जळाला
2 द्विपक्षीय संबंध कोमात, तरी व्यापार जोमात; भारत-चीनच्या व्यापारात ३३ टक्क्यांनी वाढ
3 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : लेफ्ट. कर्नल पुरोहित यांच्या जामीनावर १७ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
Just Now!
X