महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्येही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना स्थिती पाहता बिहार सरकारनं राज्यात २५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. पुढचे दहा दिवस लॉकडाउनचे निर्बंध लागू असतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘आज सहयोगी मंत्रिमंडळ आणि पदाधिकाऱ्यांसोबत बिहारमध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनची समीक्षा केली. त्यात लॉकडाउनमुळे सकारात्मक प्रभाव आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुढचे १० दिवस म्हणजेच १६ मे ते २५ पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.’, असं ट्वीट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे.

गेल्या तीन आठवड्यात राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली आहे. एका दिवसात करोना रुग्णांची संख्या १० हजाराच्या खाली आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. बिहार सरकारने लॉकडाउनचा प्रभाव आमि पुढच्या नियोजनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला होता. त्यात अधिकाऱ्यांनी लॉकडाउन वाढण्यावर भर दिला होता.

Covid 19: मृतांची संख्या लपवण्यासाठी योगी सरकार मृतदेह नदीत टाकून देत आहे; खासदाराचा आरोप

देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे ४१२० जण मृत्युमुखी पडल्यामुळे देशातील करोनामृत्यूंचा आकडा २,५८,३१७ वर पोहोचला आहे. याच कालावधीत आणखी ३,६२,७२७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केलं आहे. भारतीयांसाठी चिंताजनक बाब म्हणजे मागील २४ तासांमध्ये करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नव्याने करोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांपेक्षा १० हजारांनी अधिक आहे.