बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरावर आहे. पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातच बिहारमधील भाजपाचा प्रमुख चेहरा आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पाटण्यातील एम्स रुग्णालयात ते उपचारांसाठी दाखल झाले आहेत. यामुळे त्यांना काही काळ प्रचारापासून दूर रहावं लागणार आहे.

सुशील कुमार मोदी यांनी स्वतः काही वेळापूर्वी ट्विटरवरुन याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, “मी करोना पॉझिटिव्ह आलो आहे. तरी माझ्या प्रकृतीची सर्व परिमाणं सर्वसाधारण आहेत. दोन दिवसांपासून थोडा ताप येत होता. तपासणीनंतर अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, चांगल्या उपचारांसाठी एम्स पाटणामध्ये दाखल झालो आहे. फुफ्फुसांचं सीटी स्कॅनही नॉर्मल आहे. लवकरच निवडणूक प्रचारासाठी मी हजर असेल.”

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जदयू आणि भाजपाची युती असून दुसरीकडे राजद आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर लोजपाने एनडीएतून बाहेर पडत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचारादरम्यान राजकारणही चांगलंच तापलं आहे. दरम्यान, भाजपाने आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रसिद्ध केलेल्या या जाहीरनाम्यात बिहारच्या जनतेला मोफत करोनाची लस देण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. यावरुन आता भाजपावर टीका केली जात आहे. करोनाच्या लशीवरुनही भाजपाने राजकारण सुरु केल्याचे विरोधक म्हणत आहेत.