बिहारमध्ये तीन टप्प्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या ‘एनडीए’विरोधात राजदप्रणीत काँग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभं केलं आहे. मतमोजणीनुसार, बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारसाठी निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिलं होतं. याचवरुन आता भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बिहारमधील निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशाचे श्रेय फडणवीसांना दिलं आहे.

नक्की वाचा >> बिहारमध्ये शिवसेनेचे पानिपत; ‘नोटा’पेक्षाही कमी मतं

बावनकुळे यांनी टीव्ही नाईन मराठीशी बिहार निवडणुकीसंदर्भात बातचीत केली. यावेळी त्यांनी फडणवीस यांचे तोंडभरुन कौतुक केलं. “देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने संघटनात्मक बांधणी करुन निवडणुकीसाठी प्रचार केला. मोदीजींच्या सात वर्षातील कार्यकाळामध्ये समाजातील शेवटच्या व्यक्तीसाठी केलेल्या योजना आणि सर्व धर्मातील व्यक्तींना न्याय देण्याचे जे प्रयत्न केले ते मतदारांपर्यंत पोहचवले. त्यामुळेच या मतमोजणीमधून निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे. देशातील सरकारने, नितीश कुमार यांच्या सरकारने गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा दिला. त्याचाच परिणाम निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसतोय,” असंही बावनकुळे म्हणाले.

“मोदींचे काम, नितीश कुमार यांचे काम तसेच फडणवीस यांनी घेतलेली मेहनत याचा हा विजय आहे. फडणवीस हे संघटनात्मक, रचनात्मक आणि नियोजनात्मक काम करणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे प्रचाराचे चांगले नियोजन झाले. मोदींनी केलेल्या विकासकामांचा आणि व्हिजनचा फायदा झाला. मोदी या शतकामध्ये भारताला सशक्त बनवण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करतील असा विश्वास भारतीयांना असल्याचे या निकालांमधून दिसून आलं,” असं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

फडणवीस हे राष्ट्रीय नेतृत्व आहे का यासंदर्भात प्रश्न विचारला असता बावनकुळे यांनी, “फडणवीस यांची बिहारच्या निवडणुकीसाठी नियुक्ती झाल्यानंतर किंवा त्यापुर्वीही आपण अनेकदा पाहिले आहे की नागपूरमधील देवेंद्र फडणवीस असो किंवा नितीन गडकरी असो दोन्ही नेते राष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत. फडणवीस यांचा देशाच्या राजकारणाचा आणि राज्याच्या राजकारणाचा चांगला अभ्यास आहे त्याचा नक्कीच फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे,” असं म्हटलं आहे.

बिहारमधील निकालांचे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही पडसाद दिसतील का यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे यांनी आम्ही सत्तेसाठी काम करत नाही असं म्हटलं आहे. “महाराष्ट्रात सत्तेची घाई भाजपाला नाहीय. एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेसमोर जातोय. महाराष्ट्र सरकार अनेक बाबतीत मागे पडलं आहे. समाजातील कोणत्याही घटकाला हे न्याय देत नाहीय. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारविरोधात एक हजारहून अधिक मुद्दे तयार झाले असून ते आम्ही सरकारसमोर मांडणार आहोत. आम्ही सत्तेसाठी काम करत नाही,” असं बावनकुळे म्हणाले.