बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर येत असली, तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतील नाराजी नाट्य अजूनही संपलेलं नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या विरोधी सूर लावला आहे. चिराग पासवान यांनी मंगळवारी रात्री भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन एक विनंती केली आहे.

बिहार विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच भाजपाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज आहे. हाच नाराजीचा सूर लावत चिराग पासवान यांनी मंगळवारी रात्री भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नड्डा यांना विधानसभा निवडणुकीत जदयूपेक्षा (संयुक्त जनता दल) जास्त जागा लढवण्याची विनंती केली. याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पत्र लिहिलं असून, बिहारमधील राजकीय परिस्थितीकडे लक्ष वेधलं आहे.

यावेळी बिहारमधील जनता नितीश कुमार यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे अशा वातावरणात भाजपानं जदयूपेक्षा जास्त जागा लढवाव्यात, असं चिराग पासवान यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. एनडीएच्या कार्यकाळाविषयी प्रश्न विचारण्यात आला असता लोजपाचे महासचिव अब्दुल खालिक म्हणाले, पुढली बैठकीत बिहार प्रथम, बिहारी प्रथम या अजेंड्यावर चर्चा करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

“लोजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीत चिराग पासवान यांना एनडीएत सहभागी होण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. निवडणूक एनडीएसोबत लढवायची की नाही, याचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार आहे. बिहारसाठी घेण्यात आलेल्या निर्णयासंदर्भात चिराग पासवान यांनी पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन केलं आहे,” असंही खालिक यांनी सांगितलं.

बुधवारी लोजपाच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करण्यात आल्याचं वृत्त असून, त्यानंतर चिराग पासवान यांनी भाजपाध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली. भाजपाध्यक्षांनाही पासवान यांनी जदयूपेक्षा जास्त जागा लढवण्याची विनंती केली आहे.