बिहारमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) जागावाटप निश्चित झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर भाजपा-जेडीयू-एलजेपी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि त्यांचा मुलगा खासदार चिराग पासवान हेही उपस्थित होते. या घोषणेनंतर शाह यांनी २०१९ मध्ये २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला. तर नितीश कुमार यांनी एनडीए बिहारमध्ये २००९ पेक्षाही जास्त जागी विजयी होईल, असे म्हटले.

दिर्घ चर्चेनंतर भाजपा-जेडीयू १७-१७ आणि एलजेपी ६ लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याचे निश्चित झाले. शाह म्हणाले की, रामविलास पासवान हे आगामी राज्यसभा निवडणुकीत एनडीएचे उमदेवार असतील. एनडीएच्या युतीची ताकद पाहून तिन्ही पक्षांनी हा निर्णय घेतला आहे. लवकरच एनडीएचा राजकीय अजेंडा समोर येईल.

त्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, अमित शाह यांनी घोषणा केली असेल तर त्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. कोणत्या जागेवर कोण लढेल, हे आम्ही सर्वजण मिळून निश्चित करु. आज जागा निश्चिती झाली आहे. बिहारमध्ये आम्हाला चांगले यश मिळेल. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलण्याची माझी सवय नाही. २००९ मध्ये बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूची युती होती. बिहारमध्ये ४० पैकी ३२ जागा मिळवण्याची क्षमता होती. २००९ पेक्षाही जास्त जागा आम्ही जिंकू.

युतीमध्ये सर्व काही ठीक असून पुढे ही व्यवस्थित असेल, असा दावा रामविलास पासवान यांनी केला. परंतु, दोन दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा चिराग पासवान यांनी जागा वाटपावरुन भाजपावर दबाव आणला होता. त्यानंतर पासवान हे एनडीएतून बाहेर पडतील, असे बोलले जात होते. रविवारी पत्रकार परिषदेत पासवान यांनी अमित शाह, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि अरुण जेटली यांचे आभार मानले.