भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. सुषमा स्वराज यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील नेते सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहत आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर सुषमा स्वराज यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो शांघाय सहयोग शिखर परिषदेतील (SCO) आहे. हा फोटो खास आहे कारण या फोटोतून भारतातील नारीशक्तीचं दर्शन होत आहे. या फोटोत १० देशांचे परराष्ट मंत्री उभे असलेले दिसत आहेत. पण फोटोत सुषमा स्वराज एकमेव महिला आहेत. या फोटोने जगाला भारतातील महिलांची ताकद दाखवून दिली होती.

२०१४ ते २०१९ दरम्यान सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक देशांचे दौरे केले. सुषमा स्वराज यांनी अनेक परिषदेंमध्येही सहभाग घेतला. यामधीलच एक २०१८ मधील शांघाय सहयोग शिखर परिषद होती. या परिषदेत चीन, कझाकिस्तान, रशिया यांसारखे एकूण १० देश सहभागी झाले होते. विशेष म्हणजे परराष्ट्र मंत्र्यांच्या यादीत सुषमा स्वराज एकमेव महिला होत्या.

सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेताना नरेंद्र मोदींना अश्रू अनावर

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

नऊ परराष्ट्र मंत्र्यांसोबत उभ्या राहिलेल्या सुषमा स्वराज यांचा फोटो त्यावेळीही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अनेकांना हा फोटो आवडला होता. हा फोटो समोर आल्यानंतर जगाने भारताला सलाम करत भारतीय नारीशक्तीचं कौतुक केलं होतं. २०१८ नंतर २०१९ मध्येही शांघाय सहयोग शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या सुषमा स्वराज एकमेव महिला परराष्ट्र मंत्री होत्या.

मंगळवारी रात्री कार्डिअॅक अरेस्टमुळे सुषमा स्वराज यांचे निधन झाले. मंगळवारी रात्रीच त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती स्वराज कौशल आणि कन्या बांसुरी आहेत.

भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. प्रकृतीच्या कारणावरून २०१९ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे त्यांचे ट्वीट अखेरचे ठरले. त्यात त्यांनी ‘मोदीजी धन्यवाद. मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहात होते,’ असे नमूद केले होते.