अमेरिकेच्या दुतावासात सुरक्षेचे कारण पुढे करत डोक्यावरील पगडी उतरविण्याची सक्ती केल्यामुळे भाजपच्या खासदाराने व्हिसा नाकारल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विरेंद्र सिंग उत्तर प्रदेशातील खासदार असून ते तीनवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. अमेरिकेन दुतावासाने शेतीच्या समस्येसंदर्भात काही दिवसांपूर्वी आपली मुलाखत घेतली होती आणि त्यांनीच मला अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले होते, अशी माहिती विरेंद्र सिंग  यांनी दिली. मात्र, अमेरिकन दुतावासामध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत वेगळाच प्रकार घडला. दुतावासात प्रवेश करताना सिंग यांना डोक्यावरील पगडी उतरविण्यास सांगण्यात आले. मात्र, ही पगडी म्हणजे आमची पारंपरिक शान असल्याचे सांगत विरेंद्र सिंग यांनी पगडी उतरविण्यास नकार दिला आणि तेथून निघून आले.
शाहरूख खानला लॉस एंजलिस विमानतळावर चौकशीसाठी रोखले
मला बुधवारी अमेरिकन दुतावासात व्हिसाच्या प्रक्रियेसाठी बोलविण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मला पगडी उतरविण्यास सांगितले. मी तसे करू शकत नव्हतो. मी एक शेतकरी आहे आणि पगडी ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. तसेच हा देशाच्या प्रतिष्ठेचाही मुद्दा होता. केवळ सुरक्षेच्या कारणास्तव मी पगडी कशी काय उतरवणार? मी कदापि तसे करणार नाही. अमेरिकेने मला त्यांच्या देशात बोलवले होते. मात्र, मी व्हिसा नाकारला. मला अमेरिकेला जाण्यात रस नाही, असे सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
विरेंद्र सिंग हे लोकसभेच्या सभागृहातही नेहमी पगडी घालूनच वावरताना दिसतात. ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. या प्रकाराबद्दल परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना विचारणा करण्यात आली असता, अशी कोणतीही तक्रार आमच्यापर्यंत आली नसल्याचे सांगितले. तक्रार आल्यास आम्ही अमेरिकन अधिकाऱ्यांना याबद्दल जरूर विचारणा करू, असेही भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने सांगितले.
अपमान होऊनही शाहरुख परत अमेरिकेला का जातो?- शिवसेना