भाजपा आणि एनडीएचे खासदार संसदेत कामकाज न झालेल्या २३ दिवसांचं वेतन आणि भत्ते परत करणार आहे. या २३ दिवसांमध्ये संसदेचं कामकाज अजिबात न झाल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्या संपूर्ण दिवसांसाठी मिळणारं वेतन आणि भत्ते भाजपा-एनडीएचे खासदार परत करतील अशी माहिती त्यांनी दिली. २९ जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून अधिवेशन संपत आलं आहे. मात्र या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर सभागृह ठप्प झाल्याने काम सुरळीत होऊ शकलेलं नाही.

अनंतकुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, ‘भाजपा-एनडीएच्या खासदारांनी संसदेत कामकाज न झालेल्या २३ दिवसांचे भत्ते आणि वेतन परत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पैसा लोकांची सेवा करण्यासाठी मिळत असून जर आम्ही ते करण्यात असक्षम असू तर हा पैसा घेण्याचा आम्हाला अधिकार नाही’.

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या राजकारणामुळे राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज होऊ शकले नसल्याचा आरोप केला. आम्ही सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहोत मात्र ते कामकाज होऊ देत नाहीयेत असं त्यांनी म्हटलं.