लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्हिजन २०२२ सादर केला. तसेच विरोधक हे हताश आणि हतबल झाल्याचा टोलाही लगावला. आम्ही पुनरागमन करणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. विरोधकांकडे न नेता आहे, न निती आणि रणनितीचाही अभाव आहे. त्यामुळे विरोधक हताश झाले असून त्यांनी नकारात्मक राजकारण सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी राजकीय प्रस्ताव सादर केला. तो सर्वसहमतीने संमत करण्यात आला. या प्रस्तावात २०२२ पर्यंत ‘न्यू इंडिया’चे व्हिजन साकार करण्याबाबत म्हटले आहे. राजकीय प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना न्यू इंडियाचा उल्लेख केला आहे. पक्षाच्या मते, न्यू इंडिया मिशन साकार झाल्यास देशात न कोणी गरीब असेल आणि ना ही कोणी बेघर राहील.

पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वांत लोकप्रिय नेता असल्याचे जावडेकर यांनी म्हटले. साडेचार वर्षांच्या कार्यकाळानंतरही त्यांची लोकप्रियता ७० टक्के आहे. यापूर्वी जगात असे कधीच झाले नव्हते, असे ते म्हणाले. यावेळी पक्षाच्या विविध राज्यातील प्रमुखांनी आपल्या राज्यातील अभियान आणि कामांचा अहवाल सादर केला.