पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा भारतीय जनता पार्टीकडून १४ ते २० सप्टेंबर या आठवड्यात ‘सेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. १७ सप्टेंबर २०२० रोजी पंतप्रधान मोदी यांचा ७० वाढदिवस आहे. यासाठी भाजापाकडून विशेष तयारी केली जात आहे.

सेवा सप्ताह अंतर्गत भाजपाकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केली आहे. पक्षाकडून सर्व देशभरातील सर्व भाजपा प्रदेशाध्यक्षांना सेवा सप्ताह दरम्यान कोणते कार्यक्रम घेतले जावे यासंदर्भात एक पत्रक देखील पाठवण्यात आलेले आहे. भाजपा केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख व भाजपा सरचिटणीस अरूण सिंग यांनी हे पत्रक पाठवले आहे. यामध्ये सेवा सप्ताह अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची यादी व सामाजिक उपक्रमांसदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.

पंतप्रधान मोदी यांचा यंदा ७० वा वाढदिवस असल्याने, भाजपाकडून आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी देखील ‘सेव्हन्टी’ ही थीम ठरवण्यात आली आहे.परिपत्रकानुसार ठरवण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये देशभरातील प्रत्येक मंडळातील पात्र ७० व्यक्तींना कृत्रिम हात-पाय व अन्य आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. ७० अंध व्यक्तिंना चष्मे दिले जाणार आहेत. याशिवाय भाजपाचे नेते कोविडच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करत ७० रुग्णालयांमध्ये व गरीब वस्तीत फळवाटप देखील करणार आहेत.

याशिवाय पक्षाकडून नेत्यांना व कार्यकर्त्यांना स्थानिक रुग्णालयांच्या गरजेनुसार ७० करोनाबाधितांसाठी प्लाझ्मा दानाची देखील व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पुनम महाजन यांनी देशभरातील मोठ्या राज्यांमध्ये किमान ७० रक्तदान शिबीरं व छोट्या राज्यांमधील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक रक्तदान शिबीर घेण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत.