पंजाब विधानसभेत ठराव मंजूर

जालियानवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटिश सरकारने माफी मागावी, असा ठराव पंजाब विधानसभेने बुधवारी एकमताने संमत केला. संसदीय कार्यमंत्री बम्ह मोहिंद्रा यांनी मांडलेल्या या ठरावाला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला.

१३ फेब्रुवारी १९१९ रोजी अमृतसरमधील जालियानवाला बागेत झालेले निष्पाप निदर्शकांचे दुर्दैवी हत्याकांड ही ब्रिटिशांच्या भारतातील वसाहतवादी राजवटीच्या सर्वाधिक भयानक स्मृतींपैकी एक आहे. जुलमी अशा रौलेट कायद्याविरुद्ध शांततेने निदर्शने करीत असलेल्या स्थानिकांविरुद्ध करण्यात आलेल्या क्रूर लष्करी कारवाईचा जगभरात निषेध करण्यात आला आहे, असे या ठरावात म्हटले आहे.

मात्र, या दु:खद घटनेची शताब्दी आम्ही साजरी करत असताना ब्रिटिश सरकारने भारताच्या लोकांची औपचारिक माफी मागितली तरच त्याची योग्य पोचपावती मिळू शकेल. त्यामुळे जालियानवाला बागेतील निष्पाप लोकांच्या कत्तलीची माफी मागण्याबाबत ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी हे सभागृह राज्य सरकारला एकमताने शिफारस करत आहे, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे. सत्ताधारी काँग्रेससह शिरोमणी अकाली दल- भाजप, आप आणि लोक इन्साफ पार्टी या विरोधी पक्षांनीही ठरावाला पाठिंबा दिला.