जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरु आहे. रिलायन्स जिओने डबल धमाका ऑफर जाहीर केल्यानंतर आता सरकारी कंपनी बीएसएनएलने फिफा वर्ल्ड कप रिचार्ज ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना फक्त १४९ रुपयात दररोज ४ जीबी डेटा मिळणार आहे. १४ जून ते १५ जुलै या काळात फिफा वर्ल्डकप स्पर्धा रंगणार असून त्या संपूर्णकाळात रिचार्जची सुविधा उपलब्ध असेल.

बीएसएनएलचे सर्व सर्कल्स, वेबसाईट तसेच कंपनीच्या गॅलरीमधून ग्राहकांना रिचार्ज करता येईल. जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांना कडवी टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ही नवी ऑफर आणली आहे. बीएसएनएलच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना १४९ रुपयात फक्त इंटरनेट डेटा मिळेल. एसएमएस आणि कॉलमध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही. फक्त २८ दिवसांसाठी हा प्लॅन आहे.

जिओच्या ऑफरमध्ये दर दिवसाला ३ जीबी डेटा, अमर्यादीत कॉल्स आणि दिवसाला १०० एसएमएस मोफत आहेत. बीएसएनएलपेक्षा जिओ प्लानमध्ये डेटा कमी आहे. पण कॉल्स आणि एसएमएसची सुविधा मुबलक आहे.

काय आहे जिओची ऑफर
रिलायन्स जिओ दिवसागणिक नवनवीन ऑफर्स जाहीर करत आपल्या ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिओने नुकतीच आणखी एक ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये जिओ ग्राहकांनी जिओचा कोणताही प्लॅन घेतला तरी त्यावर १.५ जीबी डेटा मिळणार आहे. ही ऑफर ३० जूनपर्यंत लागू असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. एअरटेलने नुकतीच आपल्या १४९ आणि ३९९ रुपयांच्या प्लॅनवर १ जीबी डेटा देण्याचे जाहीर केल्यानंतर जिओने १.५ जीबी देण्याची घोषणा केली आहे.

जिओच्या १४९, ३४९ आणि ३९९ व ४४९ या प्लॅनवर ग्राहकांना रोज ४ जी ३ जीबी डेटा मिळणार आहे. तर ज्यावर आता २ जीबी डेटा मिळतो त्यावर ३.५, ३ जीबी मिळत असेल तर ४.५, ४ जीबी मिळत असल्यास ५.५ आणि ५ जीबी असेल तर ६.५ जीबी डेटा मिळणार आहे. याबरोबरच जिओने ३०० रुपयांपेक्षा अधिकच्या रिचार्जवर जवळपास १०० रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. सध्या २०० रुपयांच्या रिचार्जवर २० टक्के सूट मिळणार आहे. जिओ अॅपमध्ये रिचार्ज केल्यावरही ही ऑफर मिळू शकणार आहे.