देशात पूर्वीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा बोलबाला होता. विद्यमान केंद्र सरकारला जुन्या सरकारकडून काय मिळाले हे पाहणे महत्त्वाचे आहे. या सरकारचा जास्त वेळ पूर्वी पडलेले खड्डे भरण्यातच गेला, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. भजी विकण्यात गैर काहीच नाही, असे सांगत त्यांनी नरेंद्र मोदींच्या विधानाचे समर्थनही केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोमवारी राज्यसभेत चर्चा झाली. या चर्चेत अमित शहा यांनी सहभाग घेतला. राज्यसभेतील अमित शहांचे हे पहिलेच भाषण होते. शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशात ५५ वर्षे एकाच कुटुंबाने राज्य केले. ३० वर्ष देश अस्थिरतेच्या सावटात वावरत होता. पण २०१४ मधील निवडणुकीत जनतेने ऐतिहासिक बहुमताने मोदी सरकारला सत्तेवर आणले. देशात आता स्थिर सरकार असून भाजपने एनडीएतील घटकपक्षांच्या साथीने देशाला पुढे नेले, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पकोड्याचा (भजी) ठेला सुरू करून बेरोजगारांनी रोजगार मिळवावा, असा सल्ला दिला होता. या विधानावरुन विरोधकांनी मोदींची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. याचाही अमित शहा यांनी समाचार घेतला, मोदींनी भजी विकून पैसे कमावण्याचा सल्ला दिला यावरुन काही लोकं टीका करतायंत. पण भजी विकणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर भजी विकणाराही मोठी व्यक्ती होऊ शकते. भविष्यात भजी विकणाऱ्याची तिसरी पिढी या देशातील सर्वात मोठे उद्योजकही असू शकतात, असे त्यांनी सांगितले. भजी तळण्यात गैर काही नाही. पण मेहनतीने पैसे कमावणाऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणे गैर आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांना चिमटा काढला.

देशातील ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना ५ लाखांचा आरोग्य विमा देणारी योजना मोदी सरकारने आणली आहे. प्रत्येकाला हक्काचे घर देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. देशात सरकारने ७ कोटींपेक्षा जास्त शौचालये बांधलीत. २०२२ पर्यंत प्रत्येक घरात शौचालय असेल, ३ कोटी ३० लाख गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले, ५ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी विमा योजनेचा लाभ मिळाला, असे सांगत त्यांनी सरकारने केलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला. आम्ही लोकांना चांगले वाटतील असे निर्णय घेत नाही. आम्ही लोकांसाठी हितकारक निर्णय घेतो. गेल्या ५५ वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही ते मोदी सरकारने केले, असेही ते म्हणालेत.