सुधारित नागरिकत्व कायद्यावरून पुन्हा एकदा संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी पक्षावेगळाच सुर आळवला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी ट्विटकरू सीएए व एनआरसीविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे जाहीर अभिनंदन देखील केले आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे मात्र जदयुचे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अडचण झाल्याचे दिसत आहे.

सुरूवातीपासूनच प्रशांत किशोर यांनी सीएए व एनआरसी विरोधी भूमिका घेतलेली आहे. एवढेच नाहीतर त्यांनी या अगोदर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देखील याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते.

सीएएच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दोन्ही कायद्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल मी काँग्रेस नेतृत्वाचे अभिनंदन करतो. तसेच, स्पष्टपणे सीएए आणि एनआरसीचा अस्वीकार केल्याबद्दल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचेही विशेष आभार व अभिनंदन. याचबरोबर त्यांनी ट्विमध्ये हे देखील म्हटले की मी खात्री देतो की बिहारमध्ये सीएए आणि एनआरसी लागू होणार नाही.

या अगोदर प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सीएएच्या मुद्यावरून अप्रत्यक्षरित्या टोला लगावत म्हटले होती की, पंजाब, केरळ व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सीएए व एनआरसीचा विरोध केला आहे. आता वेळ आली आह की अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करावी.