आपल्या आकाशगंगेच्या चार पट व्यास असलेली पण बाल्यावस्थेत असलेली १० अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेली दीर्घिका (गॅलेक्सी) खगोलशास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. कॅलटेक म्हणजे कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले असून ही दीर्घिका जन्माला येत असताना तिचा वेध घेण्यात यश आले आहे. या दीर्घिकेतील वायू महाविस्फोटाच्या वेळचे असण्याची शक्यता असून ते थंड होत ही दीर्घिका बनत आहे. कॅलटेकने बनवलेल्या कॉस्मिक वेब इमेजर या पॅलोमार वेधशाळेतील दुर्बीणीला या बाल दीर्घिकेची छायाचित्रे टिपण्यात यश आले आहे. आंतरतारकीय माध्यमांच्या वेटोळ्याला ती जोडली गेली असून दीर्घिकांमध्ये फिरणारा वायू म्हणजे हे आंतरतारकीय माध्यम आहे व ते विश्वात पसरलेले आहे. वायूंच्या शीतकरणातून बनणाऱ्या दीर्घिकेचे प्रारूप प्रत्यक्ष शोधण्यात आले असून विश्वाच्या प्रारंभी थंड वायू विश्वाच्या जाळ्यातून दीर्घिकांमध्ये येतो व त्यामुळे ताऱ्यांच्या निर्मितीस चालना मिळते. कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक व प्रमुख संशोधक ख्रिस्तोफर मार्टिन यांनी सांगितले की, दीíघका कशा बनतात त्याचा हा पुरावा आहे. नेचर या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सादृश्यीकरण व सैद्धांतिक पातळीवरही थंड वायूंमुळे दीर्घिका तयार होतात हे सांगण्यात आले होते, पण त्याचे पुरावे मिळत नव्हते ते आता मिळाले आहेत. बाल दीíघका ४ लाख प्रकाशवर्षे व्यासाची असून ती आकाशगंगेपेक्षा चार पट अधिक आहे. त्या  दीर्घिका प्रणालीत दोन क्वासार तारे असून त्यातील यूएम २८७ हा जवळचा आहे. त्यामुळे त्याचा प्रकाश बॅटरीच्या झोताप्रमाणे पडतो, त्यामुळे वैश्विक जाळे म्हणजे आंतरतारकीय द्रव्य त्या प्रकाशात चमकते. त्या जाळ्यातून दीíघकेच्या निर्मितीसाठी वायू मिळतात. गेल्या वर्षी सेबास्टियानो कॅटलुपो व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक संशोधन प्रबंध नेचर नियतकालिकात लिहिला होता. त्यात यूएम २८७ या क्वासारच्या पुढील मोठय़ा वैश्विक आंतरतारकीय द्रव्याचा उल्लेख होता. ते नुसते वैश्विक जाळे असते तर इतके प्रकाशित दिसले नसते पण क्वासारमुळे प्रकाशित दिसते. सप्टेंबर २०१४ मध्ये मार्टिन व त्यांचे सहकारी कँटलुपो यांनी त्या निरीक्षणांचा पाठपुरावा केला. त्यात यूएम २८७ ची छायाचित्रे वेगवेगळ्या तरंगलांबीला एकाच वेळी टिपण्यात आली. लायमन अल्फा लाइन ही प्रारण रेषा त्यात दिसून आली. ही रेषा आण्विक हायड्रोजन वायूचे अस्तित्व दाखवते. ती रेषा विश्वातील ती विशिष्ट वस्तू ही बाल्यावस्थते असल्याचे निदर्शक असते. दोन क्वासारमधील भागाचे बहुतरंगलांबीचे नकाशे वर्णपंक्तीय प्रतिमांच्या मदतीने संशोधकांनी तयार केले आहेत. त्यात चकतीसारखा एक भाग फिरताना दिसतो व त्याची एक बाजू आपल्या बाजूने गतीमान दिसते व दुसरी विरुद्ध दिशेने गतीमान दिसते. त्या चकतीच्या पलीकडे एक भेंडोळे दिसते. तो वैश्विक आंतरतारकीय द्रव्याचा भाग आहे. ही चकती सेकंदाला चारशे किलोमीटर वेगाने फिरत असून तिचा वेग आकाशगंगेच्या वेगापेक्षा जास्त आहे.

नव्या दीर्घेकेची वैशिष्टय़े
* व्यास- आकाशगंगेच्या चार पट.
* अंतर- १० अब्ज प्रकाशवर्षे.
* तारे- दोन क्वासार ताऱ्यांचा समावेश.
* निर्मिती- वायूंचे शीतकरण कारणीभूत.