देशात करोनाच्या संकट काळात उद्योग धंद्यांसोबतच शिक्षण व्यवस्थेलाही मोठा फटका सहन करावा लागला आहे. लॉकडाउन काळात विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. देशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये आणि शिक्षणसंस्थांमध्ये ही परिस्थिती असताना देशातील प्रतिष्ठेच्या अभियांत्रिकी शिक्षण संस्था IIT मधल्या इंजिनीअर्सला देखील करोनाचा फटका बसला आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर परदेशी कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून देशातील आयआयटींमधून उमेदवार निवडतात. त्यांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. यंदा मात्र हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटल्याचं स्पष्ट झालं आहे. देशातल्या विविध आयआयटीमधून यंदा २०० हून कमी इंजिनीअर्सला प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरवर्षी १ डिसेंबरला देशातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या आयआयटी संस्थांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट होतात. जगभरातून मोठमोठ्या कंपन्या देशातील आयआयटींमधून इंजिनीअर्सना नोकऱ्या देतात. मात्र, देशात आणि जगभरात निर्माण झालेल्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण या वर्षी घटलं आहे. यामध्ये फक्त नोकऱ्यांची संख्याच कमी झालेली नसून या इंजिनीअर्सला ऑफर केल्या जाणाऱ्या पगारामध्ये देखील घट झाली आहे.

IIT मधील आकडेवारी घटली

आयआयटी मुंबईमध्ये या वर्षी फक्त ५८ इंजिनीअर्सला परदेशी कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा तब्बल १५९ इतका होता. त्याचवेळी आयआयटी कानपूरमधील आकडा देखील खाली आला आहे. आयआयटी दिल्लीमध्ये गेल्या वर्षी ४५ इंजिनीअर्सला कॅम्पसमधून नोकऱ्या मिळाल्या होत्या. हा त्यांचा सर्वाधिक आकडा होता. मात्र, या वर्षी तो आकडा पुन्हा खाली आला आहे.आयआयटी रुरकी, आयआयटी गांधीनगरमध्ये देखील हीच परिस्थिती दिसून आली.

एकीकडे मिळणाऱ्या नोकऱ्यांची संख्या कमी झालेली असताना दुसरीकडे मिळालेल्या नोकऱ्यांमध्ये देखील पगाराच्या ऑफर्सचा आकडा खाली आला आहे. आयआयटी रुरकीमध्ये गेल्या वर्षीच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक वार्षिक पगाराचा आकडा १ कोटी ५३ लाख ९७ हजार इतका होता. या वर्षी तो ६९ लाख ५ हजार इतका खाली आला आहे. आयआयटी मुंबईमध्ये २०१९मध्ये १.६४ लाख अमेरिकी डॉलर इतकं सर्वाधिक वार्षिक वेतन मिळालं होतं. यंदा हा आकडा १.५७ लाख युरोपर्यंत खाली आला आहे.

‘कसे तरी’ शिक्षण!

नोकऱ्या आणि पगार घटण्याचं कारण काय?

दरम्यान, आयआयटी गुवाहाटीचे प्लेसमेंट फॅकल्टी कोऑर्डिनेटर बिथिया ग्रेस जगननाथन यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना यामागचं संभाव्य कारण सांगितलं आहे. “करोनाच्या साथीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि वारंवार बदलणारे प्रवासविषयक नियम यामुळे गेल्या दोन वर्षात मिळणाऱ्या नोकऱ्यांपेक्षा यावर्षी मिळणाऱ्या नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे. लॉकडाउनमुळे परीक्षा आणि मुलाखती ऑनलाई पद्धतीने घेणं, अनेक उमेदवार दूरवरच्या भागात असणं, त्यांच्या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणं या गोष्टींमुळे देखील प्लेसमेंटची प्रक्रिया कठीण झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या वर्षी डिसेंबरपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत झाल्यास हे आकडे पुन्हा वाढण्याचा विश्वास या आयआयटी संस्थांना वाटतो आहे.