देशभरात निर्बंधांचे पालन आवश्यक : लस व्यवस्थापन गटाच्या प्रमुखांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली : गेल्या तीन आठवडय़ांत करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या व मृत्यू कमी झाले आहेत. काही राज्यात करोना साथ स्थिरावली आहे, असे निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी रविवारी सांगितले. थंडीत करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, दुसरी लाट येणे किंवा न येणे हे काही अंशी लोक नियमांचे पालन करतात की नाही यावर अवलंबून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

करोना लस व्यवस्थापन गटाचे प्रमुख असलेल्या पॉल यांनी सांगितले, की कोविड १९ लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना ती उपलब्ध केली जाईल. त्यामुळे आपल्याकडे आणखी एक महत्त्वाचे साधन उपलब्ध होईल. करोनारुग्णांची संख्या व मृत्यूंची संख्या कमी झाली असली, तरी केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल तसेच ३-४ केंद्रशासित प्रदेशात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. आता भारताची स्थिती चांगली आहे पण अजून ९० टक्के लोकांना करोनाचा धोका आहे.

भारतात थंडीमध्ये संसर्गाची दुसरी लाट येईल काय, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की थंडीमुळे युरोपात करोनारुग्णांची संख्या वाढल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे भारतातही तशी लाट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सणासुदीच्या काळात व थंडीत लोकांनी प्रतिबंधात्मक नियम म्हणजे मुखपट्टी, सामाजिक अंतर विसरता कामा नये. थंडीत उत्तर भारतात प्रदूषण वाढते. त्याचबरोबर सणासुदीचे दिवस असतात, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. पुढील काही महिने आव्हानात्मक आहेत. आपण आतापर्यंत जे कमावले ते गमावू शकतो. आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही. आपण काळजी घेतली नाही तर करोनाचा धोका वाढणार आहे, प्रसारही वाढणार आहे. पण तसे होऊ नये हीच सर्वाची इच्छा आहे. दुसरी लाट येणार की नाही हे आपल्या हातात आहे, त्यासाठी सर्वानी नियम व निर्बंध पाळले पाहिजेत.

लशीची साठवणूक व वितरण याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की आपल्याकडे पुरेशी शीतगृहे आहेत. त्यांची संख्या वाढवण्यात येईल. लस आली, की पुरेशी साधने उपलब्ध होतील. नागरिकांना लस दिली जाईल.

चुकीच्या धोरणांमुळे साथ हाताळण्यात अपयश -गोपालकृष्ण गांधी

अहमदाबाद : शहरीकरणास प्रोत्साहन देऊन शेतकरी, शेतमजुरांचे स्थलांतर शहरांकडे घडवणारे धोरण राबवले नसते तर कोविड साथीला तोंड देणे सोपे गेले असते असे महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांनी म्हटले आहे. गुजरात विद्यापीठाच्या १०१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित दूरसंवाद कार्यक्रमात त्यांनी सांगितले की,‘औद्योगिकीकरण व शहरीकरण यांना प्रोत्साहन देणाऱ्या आर्थिक धोरणांचा फेरविचार करण्याची गरज आहे.  कारण त्यामुळे मोठय़ा प्रमाणात लोक अस्थिर होतात. त्यातून शेतकरी, शेतमजूर हे मोठय़ा संख्येने शहरांकडे जातात. त्यामुळेच कोविड साथ हाताळण्यात आपल्याला अपयश आले.’