२९ जणांचा बळी घेणाऱ्या मथुरेतील जवाहरबाग हिंसाचाराच्या घटनेची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.

मथुरा हिंसाचाराच्या घटनेचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी भाजपचे नेते आय.पी. सिंग यांनी याचिकेत केली होती.

मात्र याचिकाकर्ता हा राजकीय नेता असल्याने ही जनहित याचिका ‘राजकीयदृष्टय़ा प्रेरित’ आहे, असे उत्तर प्रदेश सरकारतर्फे युक्तिवाद करताना अतिरिक्त महाधिवक्ता बुलबुल गोडियाल म्हणाल्या. या घटनेच्या तपासाकरिता राज्य सरकारने एक न्यायालयीन आयोग यापूर्वीच स्थापन केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सरकारचा युक्तिवाद मान्य करून न्या. श्रीनारायण शुक्ला व न्या. सुनीत कुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.