उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि गंभीर शारिरीक इजेद्वारे झालेल्या मृत्यूप्रकरणाचा तपास आता केंद्रीय तपास पथकाने (सीबीआय) हाती घेतला आहे. यासाठी योगी सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली होती.

या प्रकरणात पीडितेचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे न सोपवता तो पोलिसांनी स्वतः मध्यरात्री ३ वाजता जाळून टाकला होता. त्यामुळे भारतातील अमानुष घटनांपैकी एक ठरलेल्या या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती, अद्यापही ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. राज्य सरकार आणि पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. हा तपास सुरु असतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येईल, अशी घोषणाही केली होती.

दरम्यान, या प्रकरणी एसआयटीच्या तपासात ठपका ठेवण्यात आल्याने जिल्हा पोलीस प्रमुखासहित अनेक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.