आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या इगोवर (अहंकार) त्यांनी भाष्य केले आहे. राजकारणात मला ज्युनिअर असतानाही त्यांचा अहंकार सांभाळण्यासाठी मी त्यांना सर म्हणतो, असे चंद्राबाबू म्हणाले.

नायडू म्हणाले, जेव्हा मी अमेरिकेचे राष्ट्रपती बिल क्लिंटन यांना भेटलो होतो. तेव्हा मी त्यांना मिस्टर क्लिंटन म्हणून संबोधले होते मात्र, पंतप्रधान मोदींना मी सर म्हणतो. खरतरं मोदी राजकारणात मला ज्युनिअर आहेत. मात्र, जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा मी त्यांना सर म्हणून संबोधले. कारण ते आंध्र प्रदेशला न्याय देतील असं मला वाटलं होतं.

२०१४ मध्ये भाजपाशी हातमिळवणीही मी आंध्र प्रदेशच्या भल्यासाठी केली होती. त्यावेळी जर आम्ही या युतीशिवाय निवडणूक लढलो असतो तर कदाचित दहा जागा जास्त जिंकलो असतो. मात्र, कालांतराने मोदी माझ्या राज्यासोबत न्याय करणार नाहीत याची जाणीव मला झाल्याने या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे नायडूंनी सांगितले.

मोदी सरकार सीबीआय, ईडी आणि इतर तपास पथकांमार्फत सर्वच राजकीय पक्षांना निशाणा बनवत असल्याचा आरोपही नायडू यांनी यावेळी केला. तसेच यावेळी एका गौप्यस्फोटही त्यांनी केला. ते म्हणाले, मोदींसोबत चर्चा केल्यानंतर तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधातील खटला मागे घेण्यात आला होता.

चंद्राबाबूंनी या सर्व गोष्टी सर्वपक्षीय बैठकीत सांगितल्या. ही बैठक आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी घेण्यात आली होती. या बैठकीत वायएसआर काँग्रेस, काँग्रेस, भाजपा आणि डावे पक्ष सहभागी नव्हते.