नासाच्या चांद्रशोध उपकरणातील निरीक्षणांचा निष्कर्ष

चंद्रावरील पाणी कुठल्या एका भागापुरते मर्यादित नसून ते सर्व भागात आहे, असे मत भारताच्या चांद्रयान १ बरोबर पाठवण्यात आलेल्या नासाच्या शोधक यानाने मिळवलेल्या माहितीच्या आधारे व्यक्त करण्यात आले आहे. चंद्रावर दिवसरात्र पाणी उपलब्ध आहे, हे पाणी कुठून आले असावे व त्याचा वापर करणे कितपत शक्य आहे यावर विचार करावा लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. जर चंद्रावर अजूनही भरपूर पाणी असेल व ते मिळवता येण्यासारखे असेल तर आगामी योजनांत त्याचे रूपांतर हायड्रोजन व ऑक्सिजनमध्ये करून श्वसनासाठी ऑक्सिजन मिळवणे शक्य आहे. चंद्रावर कुठल्याही वेळी कुठल्याही रेखांशावर पाणी उपलब्ध असल्याचे संकेत मिळतात असे अमेरिकेच्या स्पेस सायन्स इन्स्टिटय़ूटचे जोशुआ बँडफील्ड यांनी सांगितले.

नेचर जिओसायन्स या नियतकालिकाने म्हटले आहे, की चंद्राचा पृष्ठभाग कसा आहे याच्याशी पाण्याच्या उपलब्धतेचा संबंध नाही. चंद्राच्या ध्रुवांवर मोठय़ा प्रमाणात पाणी आहे पाण्याचे संकेत तेथे मिळतात. काहींच्या पाण्याचे रेणू चंद्राच्या पृष्ठभागावरून शीत पट्टय़ात जाऊन उत्तर व दक्षिण ध्रुवावरील विवरात जातात.

शीत पट्टा हा असा पट्टा आहे जेथे पाण्याची वाफ व इतर अस्थिर घटक एकदम स्थिर होतात व बराच काळ वेगळय़ा रूपात टिकून राहतात. अब्जावधी वर्षे पाणी तेथे बर्फाच्या रूपात आहे. यात तीन मायक्रोमीटर तरंगलांबीपर्यंत वर्णपंक्ती टिपण्यात आल्या आहेत. त्या दृश्य प्रकाशापलीकडील असून उपारूण किरणांच्या टप्प्यात येतात. चंद्राचा पृष्ठभाग तापल्याने  प्रकाश बाहेर टाकू शकतो असा एक मुद्दा यात आहे.