कर्नाटकवर गेल्या काही दिवसांपासून अंधाराचे सावट पसरले असल्याने आता बदल अपरिहार्य असल्याचे मत व्यक्त करून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी राज्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. कर्नाटकच्या जनतेने भाजपला कौल दिला होता, मात्र सरकारने मतदारांशी प्रतारणा केली, असा आरोपही त्यांनी केला.
कर्नाटकवर गेल्या काही दिवसांपासून अंधाराचे सावट होते याचे स्मरण आपण युवा पिढीला करून देत आहोत. त्यामुळे आता जनतेला बदल हवा आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. चिकमंगळूर येथे आपल्या पहिल्याच प्रचारसभेत त्यांनी राज्यातील भाजप सरकारला लक्ष्य केले.
भाजप सरकारला विविध आघाडय़ांवर अपयश आल्याचे सांगतानाच गांधी यांनी, भाजपने मतदारांशी प्रतारण केल्याचा आरोप केला. कर्नाटकमधील खाण घोटाळ्याचा उल्लेख करून गांधी यांनी, खाण माफियांनी पर्यावरणाचा नाश केला आणि आपल्या संकुचित राजकीय स्वार्थासाठी भाजपने त्याला साथ दिल्याचा आरोप केला.
एकेकाळी कर्नाटकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध उद्योगसमूहांमध्ये स्पर्धा होती, मात्र आता त्याच्या विरुद्ध चित्र आहे. भ्रष्टाचार, सरकारची ढवळाढवळ आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे आता उद्योगसमूह कर्नाटक सोडून चालले आहेत. कर्नाटकची वैभवशाली परंपरा अबाधित ठेवण्यासाठी राजकीय स्थैर्य आवश्यक आहे. स्थिर सरकार ही काळाची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.