करोना व्हायरसवर उपचारासाठी बनवलेल्या औषधाची चाचणी स्वत:वर केल्याने हर्बल प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हर्बल प्रोडक्ट म्हणजे वनौषधी. तामिळनाडूतील ही हर्बल कंपनी सर्दीवर औषध बनवण्यासाठी ओळखली जाते. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

मृत व्यक्तीला औषधाचे ज्ञान असून तो कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर होता. मृत व्यक्तीने आणि त्याच्या बॉसने स्वत:वर या औषधाची चाचणी घेतली. औषध घेतल्यानंतर दोघे चक्कर येऊन कोसळले. त्यांना लगेच नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

प्रोडक्शन मॅनेजरने जास्त प्रमाणात औषध घेतले होते. त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या बॉसने फक्त काही थेंब औषध घेतले होते. त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाला बरे करणारे अद्यापपर्यंत कोणतेही ठोस औषध सापडलेले नाही. अमेरिकेत रेमडेसिविर या औषधावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गिलीयड सायन्सेस कंपनीने हे औषध बनवले आहे. सध्या जगातील प्रमुख देश करोना व्हायरसला रोखणाऱ्या लसीच्या संशोधनावर काम करत आहेत.