करोना व्हायरसची लागण झालेल्यांवर प्रभावी उपचार करुन, त्या रुग्णांना लवकरात लवकर करोना मुक्त कसे करता येईल? यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. चीनमध्ये करोना व्हायरसवर एक नवीन उपचार पद्धती शोधून काढण्यात आली आहे. चीनमध्ये करोनाची लागण झालेल्या पाच रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पण १२ दिवसांच्या आत त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

नव्या उपचार पद्धतीमध्ये करोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर करोना मुक्त रुग्णाचे रक्त वापरण्यात येते. चीनमध्ये याच प्रकारच्या उपचाराने पाच रुग्णांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा दिसून आली. पाच पैकी तिघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अन्य दोघांची प्रकृती स्थिर आहे. मेल ऑनलाइनने हे वृत्त दिले आहे.

करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी हा एक आशेचा किरण आहे असे या उपचार पद्धतीचे नेतृत्व करणाऱ्या एका डॉक्टराने सांगितले. मागच्या आठवडयात अमेरिकेनही रक्तावर आधारीत या उपचार पद्धतीला मंजुरी दिली आहे. युनायटेड किंगडममध्येही गंभीर रुग्णांवर याच पद्धतीने उपचार करण्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे.

बरं झालेल्या रुग्णाच्या रक्तामध्ये रोगप्रतिकारक अ‍ॅंटीबॉडीज असतात.व्हायरसविरोधात लढण्यासाठी इम्युन सिस्टिमकडून या अ‍ॅंटीबॉडीज तयार केल्या जातात. कॉनव्हॅलसंट प्लास्मा असे या उपचारपद्धतीचे नाव आहे. बरं झालेल्या रुग्णाच्या रक्तातील घटक आजारी रुग्णाच्या इम्युन सिस्टिमला बळ देतात. द शेनझेन थर्ड पीपल्स हॉस्पिटलने २७ मार्च रोजी मेडीकल पेपर प्रसिद्ध केला.

त्यात कॉनव्हॅलसंट प्लास्माद्वारे ३६ ते ७३ वयोगटातील पाच रुग्णांवर उपचार केल्याची माहिती आहे. या पाच रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिला होत्या. १२ दिवसानंतर त्याचे करोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तसेच त्याची रोगप्रतिकारक शक्ती इम्युन सिस्टिमही मोठया प्रमाणात वाढली होती.