गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर चीनने आता नरमाईची भूमिका घेतली आहे. सीमेवर भारताबरोबर आम्हाला आणखी संघर्ष नकोय असे त्यांनी म्हटले आहे. सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या बाजूलाही मोठी जिवीतहानी झाली. त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. सीमेवर निर्माण झालेली परिस्थिती दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतायत असे चीनने म्हटले आहे.

गलवान खोऱ्यातील चकमकीसाठी चीनला जबाबदार धरु नका, या आपल्या वक्तव्याचा झाओ लिजियन यांनी पुनरुच्चार केला. सीमेवरील परिस्थिती आता स्थिर आणि नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला. झाओ लिजियन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आहेत. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

चीनच्या बाजूला किती नुकसान झाले याबद्दल झाओ लिजियन यांनी माहिती देण्याचे टाळले. नेहमीच उलटया बोंबा मारणाऱ्या चीनने पुन्हा एकदा भारतावरच आरोप केला. “भारतीय सैनिक सीमा ओलांडून चीनच्या हद्दीत घुसले व हल्ला केला. यामुळे दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये हाणामारी होऊन काही मृत्यू झाले व काही जखमी झाले” असे झाओ लिजियन यांनी सांगितले. नेमकी किती जिवीतहानी झाली. त्याबद्दल त्यांनी काहीही माहिती दिली नाही.

“भारताने आपल्या सैनिकांना सीमा ओलांडण्यापासून रोखावे व कुठलीही चिथावणीखोर कृती करु नये तसेच सीमेवरील परिस्थिती जटिल होईल असे कोणतेही एकतर्फी पाऊल उचलू नये” असे झाओ लिजियन यांनी म्हटले आहे.