पूर्व लडाखच्या सीमेवरील भागातून सैन्य पूर्णपणे मागे घेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चीन भारतासमवेत प्रामाणिकपणे काम करील आणि तणाव शांत करण्याचा प्रयत्न करील, अशी अपेक्षा असल्याचे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले.
द्विपक्षीय संबंध अधिकाधिक दृढ होण्यासाठी दोन्ही देशांनी मान्य केल्याप्रमाणे सीमेवरील भागात शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. भारत आणि चीनने सैन्य मागे घेण्याचे मान्य केले असून त्या दृष्टिकोनातून यापूर्वी काही प्रमाणात प्रगती झाली आहे, असेही श्रीवास्तव म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात दूरध्वनीवरून जवळपास अडीच तास झालेल्या चर्चेनंतर ६ जुलैपासून सैन्य मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू झाली. सीमा प्रश्नाबाबत डोभाल आणि वांग यी हे विशेष प्रतिनिधी आहेत.