चीनच्या हेलिकॉप्टरने भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे, सुमारे ४ मिनिटे हे विमान भारताच्या हवाई हद्दीत घिरट्या घालत होते. भारताने या घटनेची गंभीर दखल केली असून या घटनेची चौकशी सुरु आहे.

चमोलीचे पोलीस अधीक्षक तृप्ती भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वा नऊच्या सुमारास चीनचे हेलिकॉप्टर बराहोटी क्षेत्रावर उडताना आढळले. जवळपास चार मिनिटे हे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत घिरट्या घालत होते.

हेलिकॉप्टर हद्दीत कसे आले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पण याची चौकशी सुरु आहे. नकळतपणे हे हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत आले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. हे विमान चीनच्या सैन्याचे नव्हते अशी माहितीही समोर आली आहे.

चीनचे हेलिकॉप्टर यापूर्वीही अनेकदा भारतीय हद्दीत आले आहे. २०१४ साली चमोली जिल्ह्यात अशाप्रकारे चीनी हेलिकॉप्टर घुसले होते.