नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात  उसळलेल्या हिंसाचारास काँग्रेस व मित्र पक्षच जबाबदार असून ते देशाच्या विविध भागातील आंदोलनांना खतपाणी घालून जाळपोळ व अशांततेस उत्तेजन देत आहेत,  असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये निवडणूक प्रचार सभेत केला.

कुठला पक्ष किंवा समुदायाचे नाव न  घेता त्यांनी सांगितले की, जे लोक हिंसाचाराची आग पसरवत आहेत त्यांची ओळख त्यांच्या कपडय़ांवरूनच पटली आहे. कारण ही सगळी दृश्ये दूरचित्रवाणीवरून दाखवली जात आहेत. ईशान्य व पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार सुरू आहे त्याला विरोधकांचा छुपा पाठिंबा असून काँग्रेस व मित्र पक्षांनी नागरिकत्व कायद्यावरून हिंसाचाराच्या माध्यमातून आग पेटवण्याचा प्रयत्न केला पण ईशान्येकडील लोकांनी हिंसाचाराचा मार्ग  नाकारला आहे. काँग्रेसने जी कृत्ये केली आहेत त्यावरून आम्ही संसदेत जे निर्णय घेतले ते योग्य असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

परदेशातही काँग्रेसने जी निषेध आंदोलने केली त्यावरही मोदी यांनी टीका केली, ते म्हणाले की, पहिल्यांदाच  जे पाकिस्तानने आतापर्यंत केले ते काँग्रेसने करून दाखवले, लंडन येथे शनिवारी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमून काही लोकांनी नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केले होते त्या अनुषंगाने मोदी यांनी हे भाष्य केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘ राम जन्मभूमी मुद्दय़ावरील निकाल व कलम ३७० रद्द केल्यानंतर लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर ज्या घटना घडल्या त्याचे तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांनी त्यावेळीही दूतावासाबाहेर निदर्शने केली होती. भारतीय दूतावासासमोर भारतीय लोक निदर्शने करू शकतील का, जर तसा काही प्रश्न असता तर कुठलाही भारतीय माणूस हा दूतावासात जाऊन अधिकाऱ्यांना भेटेल व नंतर त्याचे म्हणणे केंद्र सरकारला कळवले जाईल. पण हे लोक पाकिस्तानी स्थलांतरित होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.’  ‘देशाची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न काँग्रेस करीत आहे. लोक हे सगळे पाहात आहेत. आताच्या कायद्यानंतर लोकांची मोदींवर अढळ श्रद्धा निर्माण झाली आहे.  विरोधी पक्ष जी कृत्ये सध्या करीत आहे त्यावरून तरी संसदेत हे विधेयक संमत करण्याचा झालेला निर्णय हा १००० टक्के योग्यच होता हे सिद्ध झाले आहे’, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी भाजप सरकारची कामगिरी विशद केली.

भाजपची देशव्यापी प्रचार मोहीम

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध सर्वत्र निदर्शने होत असताना, या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवण्याची घोषणा भाजपने रविवारी केली. हा कायदा मुसलमान किंवा इतर कुठल्याही समुदायाबाबत पक्षपात करणारा नाही, असे पक्षाने आवर्जून सांगितले.